खेड:- शहरातील गुलमोहर पार्क येथील गोळीबार मैदानातून लॉन टेनिस खेळाचे साहित्य चोरीस गेल्याची तक्रार येथील पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोरट्याचा शोध घेण्यासाठी रत्नागिरी येथून श्वानपथकासही पाचारण करण्यात आले होते. मात्र, चोरट्याचा माग काढण्यास अपयश आले.
सह्याद्री टेनिस असोसिएशन ही रजिस्टर संस्था असून गेल्या ३० वर्षांपासून सदस्य टेनिस खेळ खेळत आहेत. २० रोजी सकाळच्या सुमारास सदस्य टेनिस खेळण्यासाठी गेले असता नेट, चेंडू दोऱ्या व इतर साहित्य घटनास्थळी आढळले नाहीत. त्यानुसार साहित्य चोरीची तक्रार नोंदवण्यात आली आहे. या तक्रारीची पोलीस निरीक्षक नितीन भोयर यांनी गंभीर दखल घेतली. चोरट्याच्या शोधासाठी श्वानपथकही पाचारण करत काही धागेदोरे हाती लागताहेत का, याचा पडताळा केला.