पोलीस कर्मचाऱ्यांसह गृहरक्षक दलाच्या जवानास धक्काबुक्की

सरकारी कामात अडथळा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

खेड:- तालुक्यातील वेरळ येथील पीर हजरत जलालशहा बाबा दर्गाजवळ दोघांमध्ये झालेली बाचाबाची व वादविवाद सोडवण्यासाठी गेलेल्या २ पोलीस कर्मचाऱ्यांसह गृहरक्षक दलाच्या जवानास धक्काबुक्की करत सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी शैलेश चव्हाण (वेरळ-खेड) यांच्यावर येथील पोलीस ठाण्यात मंगळवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला. या बाबत गृहरक्षक दलाचे प्लाटून कमांडर सचिन कडू यांनी तक्रार नोंदवली.

वेरळ येथील पीर हजरत जलालशहा बाबा यांचा १८ फेब्रुवारी उरूस होता. यावेळी शैलेश चव्हाण व झुलेवाला पंकज निळकंठ ठाकूर (रा. माणगाव) यांच्यात किरकोळ कारणावरून बाचाबाची झाली. येथे पोलीस बंदोबस्तासाठी असलेल्या महिला पोलीस हेडकॉन्स्टेबल साळवी, पोलीस हेडकॉन्स्टेबल कटनाक व गृहरक्षक दलाचे जवान सचिन हरिश्चंद्र कडू हे वादविवाद सोडवण्यासाठी गेले असता धक्काबुक्की करत कटनाक यांच्या डाव्या हातावर नखाने ओरबाडले. या प्रकरणानंतर वाद घालणाऱ्या दोन्ही व्यक्तींना पोलीस ठाण्यात घेवून जात असताना संशयिताने पोलीस अधिकारी व ठाणे अंमलदार यांच्यासमोरच गृहरक्षक दलाचे जवान सचिन कडू यांच्याकडे हातवारे करत अंगावर धावून गेला. अर्वाच्च भाषेत दरडावून बघून घेईन, अशी धमकी देत त्यांची कॉलर पकडली. सरकारी कामात अडथळा आणल्याचा ठपका ठेवत संशयितावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.