रत्नागिरी:- नैसर्गिक संकटावर मात करीत बागायतदारांनी वाचविलेला हापूस अखेर रत्नागिरीच्या बाजारात दाखल झाला आहे. शहरातील गोखले नाका येथील व्यापारी सतीश पवार यांच्या स्टाॅलवर गावखडीतील दत्ताराम पड्याळ यांच्या बागेतील हापूस विक्रीला आला असून यावर्षीच्या हंगामातील रत्नागिरीचा पहिला आंबा पवार यांच्या स्टाॅलवर विक्रीसाठी आला आहे.
गावखडी येथील दत्ताराम पड्यार यांनी पाच डझनाच्या दोन पेट्या विक्रीसाठी पाठवल्या आहेत. व्यापारी सतीश पवार यांनी रविवारी सकाळी पेट्यांचे पूजन केल्यानंतरच विक्रीसाठी ठेवला आहे. तीन हजार रूपये डझन दराने विक्री झाल्याने पेटीला १५००० रूपये दर मिळाला आहे. पवार यांच्या स्टाॅलवर देवगड हापूसही विक्रीसाठी उपलब्ध असून २५०० ते ३००० रूपये डझन दराने आंबा विक्री सुरू आहे.
आंबा विक्री व्यवसायात पवार दुसरी पिढी कार्यरत आहे. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी आंबा उत्पादन कमी आहे, शिवाय १५ ते २० दिवस ऊशिरा आंबा आला आहे. गतवर्षी पेटीला २० हजार रूपये दर मिळाला होता. यावर्षी पहिल्या पेटीला १५ हजार रूपये दर मिळाला आहे. यावर्षीच्या हंगामातील पहिला आंबा असल्याने ग्राहकांमध्येही कमालीची उत्सुकता असल्याचे व्यापारी सतीश पवार यांनी सांगितले.