संरक्षित भिंतीला भगदाड; मोठ्या नुकसानीची भीती
रत्नागिरी:- मिर्या पाटीलवाडी येथील बंधारा उध्वस्त झालेला असतानाच जाकिमिर्या येथेही समुद्राच्या लाटांनी चिर्यांची संरक्षित भिंत उध्वस्त झाली आहे. येथील बंधार्यालाही भगदाड पडले आहे. समुद्रातल्या लाटांचा जोर असाच राहीला तर पाणी शिवारातून घरापर्यंत पोचायला वेळ लागणार नाही अशी प्रतिक्रिया प्रसाद उपळेकर यांनी दिली.
बुधवारी (ता. 5) दुपारनंतर आलेल्या भरतीवेळी समुद्रात साडेमिटरच्या लाटा उठतील असा अंदाज वर्तविण्यात आला होता. त्यादृष्टीने प्रशासनाकडून किनारीवासीयांना सतर्कतेच्या सुचना दिल्या होत्या. पावसाचा जोर ओसरला असला तरीही किनारी भागात वेगवान वारे वाहतच आहेत. वार्यामुळे किनार्यावर फुटणार्या लाटांची तिव्रता अधिक आहे. उंचच उंच लाटा मिर्या बंधार्यावर येऊन आपटत आहेत. लाटांचे पाणी बंधारा ओलांडून पलिकडे येत आहेत. लाटांचा धडकी भरवणार्या आवाजाने मिर्या नागरिकांची झोपच उडाली आहे. जाकिमिर्या येथील उपळेकर यांच्या कंपाऊची चिर्याने बांधलेली भिंतीच फुटली आहे. लाटांचा जोर एवढा आहे की बंधार्याचे दगड वाहून जात आहेत. गुरुवारी (ता. 6) जोर ओसरेल अशी शक्यता होती; परंतु सायंकाळपर्यंत लाटा आणखीन वेगाने येत होत्या. हा बंधारा मजबूत करावा अशी येथील ग्रामस्थांची मागणी आहे; मात्र येथे होणारे काम समुद्राच्या लाटांना रोखूच शकणारे नाही. बंधार्याला टाकले जाणारे दगड हे छोटे असल्यामुळे अल्पावधीत ते वाहून जात आहेत. त्यामुळे होणारा खर्चही वाया जात असल्याचे ग्रामस्थांचे मत आहे. बंधार्यांचे काम निकृष्ठ दर्जाचे होत आहे अशी मागणी शासनाकडे होत आहे; परंतु त्याकडे लक्ष दिले जात नाही. फक्त आश्वासने दिली जातात. आमचं घर, संरक्षक बांध ओलांडून समुद्र आत येऊ लागला आहे. याची दखल प्रशासनाने घ्यावी, असे प्रसाद उपळेकर यांनी स्पष्ट केले आहे.