सेना ठाकरे गटाच्या रत्नागिरी तालुकाप्रमुखपदी शेखर घोसाळे

रत्नागिरी:- एकीकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला गळती लागलेली असतानाच दुसरीकडे मात्र शिवसेना पक्ष नव्या जोमाने उभ्या राहण्याच्या तयारीत असून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने जिल्ह्यात नव्या शिलेदारांच्या नियुक्ती करण्यात आल्या आहेत.

उपजिल्हाप्रमुख पदी राजापूरच्या दत्तात्रय कदम यांची वर्णी लागली असून, रत्नागिरीचे तालुकाप्रमुख म्हणून शेखर घोसाळे, तर लांजाचे तालुकाप्रमुख म्हणून सुरेश करंबेळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

महिला उपजिल्हासंघटक म्हणून राजापूरच्या सौ. उल्का विश्वासराव महिला तालुका संघटक म्हणून लांजाच्या सौ. पूर्वा मुळ्ये यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

नवनियुक्त पदाधिकाऱ्यांमुळे पक्षांमध्ये चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे. पक्ष वाढीच्या दृष्टीने नव्या जोमाने काम करण्यासाठी आणि संघटना मजबूत बांधण्यासाठी आपण प्रयत्नशील राहणार असल्याचे नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने रत्नागिरी जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्याची ही माहिती शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्ध करण्यात आली आहे.