सापुचेतळे येथे दोन दुचाकीमध्ये अपघात; एक ठार, दोन जखमी

रत्नागिरी:- लांजा तालुक्यातील सापुचेतळे ते वाघ्रट जाणाऱ्या रस्त्यावरील तरळवाडी येथे दोन दुचाकीमध्ये झालेल्या अपघात एकाचा मृत्यू झाला तर दोघेजण जखमी झाले. लांजा पोलिस ठाण्यात संशयित मयत स्वाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोपिनाथ महादेव मांडवकर (वय ४८) असे संशयित मृत स्वाराचे नाव आहे. ही घटना गुरुवारी (ता. १६) सायंकाळी सव्वा पाचच्या सुमारास सापुचेतळे ते वाघ्रट जाणाऱ्या रस्त्यावरील तरळवाडी येथे घडली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार मृत गोपिनाथ मांडवकर हे दुचाकी (क्र. एमएच-०१ बीएच ५८८०) घेऊन सापुचेतळे ते वाडीलिंबू येथे येत असताना दुचाकी निष्काळजीपणे चालवून चुकीच्या बाजूने जाऊन वाघ्रट हून येणाऱ्या दुचाकी (क्र. एमएच-०८ बीएच ०९४४) ला ठोकर देऊन अपघात केला. या अपघातामध्ये दुचाकी वरिल स्वार संतोष गंगाराम पत्याणे (४०) व मांडवकर यांच्या दुचाकीच्या मागे बसलेली सुभद्रा पाष्टे हे जखमी झाले. या प्रकरणी पोलिस हेड कॉन्स्टेबल तेजस मोरे यांनी लांजा पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी दुखापतीस व स्वतःच्या मरणास कारणीभूत झालेल्या स्वाराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.