चिपळूण:- महायुती सरकारच्या काळात महाराष्ट्राची अधोगती झाली. २०१४ पूर्वी केंद्राच्या उत्पन्नात महाराष्ट्राचा वाटा १५ टक्के होता, तो आता १३ टक्केवर घसरला घसरला आहे. दरडोई उत्पन्नातही २०१६ पासून महाराष्ट्र गुजरातच्याही मागे गेला. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार हे मोदी आणि शहा यांना घाबरतात. ७० हजार कोटी घोटाळ्याचे आरोप झाल्यावर लाचार होऊन शरमेने मान खाली घालत राष्ट्रवादीचे ४० आमदार भाजपात गेले. या गद्दारीला जनता माफ करणार नाही. या विधानसभा निवडणूकीत गद्दारांना जनता घरी बसवल्याशिवाय शांत बसणार नाही, असा इशारा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी चिपळूणातील प्रचार सभेत केले.
शहरातील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्राशेजारील पटांगणात महाविकास आघाडीचे उमेदवार प्रशांत यादव यांच्या प्रचारासाठी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत जाहीर सभा झाली. चिपळूणात स्थानिक आमदारांनी गद्दारी केल्याने प्रशांत यादव यांचे नाव निश्चीत होऊन त्यास सर्वानी पाठींबा दिला. महाविकास आघाडीला कसल्याही भानगडी नसलेल्या स्वच्छ चेहऱ्याचा उमेदवार मिळाला आहे. भाजपने शरद पवारांचा पक्ष फोडला. शिवसेनेतील काही आमदारांनी गद्दारी केल्याने महाराष्ट्राचे राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. वाशिष्टी नदीची खोली वाढवावी, रुंदीकरण करावे, असा आमचा प्रयत्न होता, परंतु त्यानंतर महायुतीच सरकार आलं आणि हे काम थांबलं. शंभर कोटी रुपये किमान या कामासाठी आवश्यक होते, मात्र विद्यमान आमदारांनी त्यासाठी प्रयत्न केला नाही. नऊ कोटी रुपये मीच मंजूर केले होते, त्यातील काही निधी आला आहे.
नवाब मलिक यांच्या मागे एडी तर लागलीच आहे, परंतु देशविरोधक कारवाई करणारा माणूस अशी फडणवीस यांनी त्यांच्यावर टीका केली होती, आरोप केला होता, परंतु त्याच भाजपच्या मित्रपक्ष असणाऱ्या राष्ट्रवादीने त्यांना उमेदवारी दिली आहे. त्यांचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे प्रचारामध्ये उतरले आहेत, याबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली. शरद पवार यांनी ज्यांना मोठं केलं, त्यांना ज्यांनी सोडलं त्यांना येत्या २० तारखेला उत्तर द्या, प्रशांत यादव जनतेसाठी २४ तास काम करतील असा विश्वास व्यक्त केला.
उमेदवार प्रशांत यादव म्हणाले, आपल्याला खरंतर निवडणूक लढवायची नव्हती, परंतु खरं पाठबळ जयंत पाटील यांनी दिलं. हात धरून पवार साहेबांपर्यंत नेलं आणि त्यांच्यामुळेच आज मी उमेदवार म्हणून तुमच्यासमोर उभा आहे. उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदावरून पाय उतार व्हावे लागले. पवारांचा पक्ष ज्यानी फोडला, त्यांना उत्तर देण्याची ही वेळ आलेली आहे. गेल्या अडीच वर्षात विद्यमान आमदारांनी विकास केवळ गवगवा केला तरी इथे मूलभूत प्रश्न प्रलंबित आहेत. वाशिष्ठेतील गाळ काढण्यासाठी नऊ कोटी मंजूर झाले, परंतु पाच ते सहा कोटी रुपये मिळाले आहेत. पुररेषेचा प्रश्न मार्गी लागलेला नाही. महाविकास आघाडीचे सरकार आल्यास टप्प्याटप्प्याने निधी आणून वाशिष्टी गाळमुक्त करू आणि चिपळूणला पूरमुक्त करू. गेल्या १५ वर्षाच्या कालावधीत मुंबई गोवा महामार्गाचे काम मार्गी लागलेले नाही. तालुक्यात तीन एमआयडीसी आहेत, त्यातही छोटे-मोठे उद्योग आपल्या जिल्ह्यातील उद्योग मंत्री असताना आले नाहीत. देवरुख एमआयडीसीचा प्रश्नही असाच आहे. वाशिष्ठी डेअरीच्या माध्यमातून ११ हजार शेतकऱ्यांना आर्थिक उत्पन्नाचा मार्ग आम्ही दिला आहे. भविष्यात चिपळूणला पूरमुक्त करणे व सरकारच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करून देणे, हे आपलं ध्येय आहे. आता शिवसेना, कॉग्रेस आपल्याबरोबर आहे. त्यामुळे आपला बंदोबस्त करायला फार वेळ लागणार नाही. यावेळी माजी आमदार रमेश कदम, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुरेश बने, निरीक्षक बबन कानावजे, सचिन कदम, राजू महाडिक, सहदेव बेटकर, नलिनी भुवड, सुभाषराव चव्हाण, स्मिताताई चव्हाण, विनोद झगडे, शशिकांत मोदी, बशीर मुर्तुझा, मुराद अडरेकर, सौ. धनश्री शिंदे, सावित्री होमकळस आदी उपस्थित होते.