रत्नागिरी पॉलीटेक्निक येथे हद्दपार आरोपीला अंमली पदार्थासह अटक

रत्नागिरी:- तीन जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आलेल्या आरोपीलाच शहरातील सरकारी पॉलीटेक्निकचे मागील बाजुस 1 लाख 22 हजार किंमतीचा 2 किलो 29 ग्रॅम गांजा सदृश्य अंमली पदार्थ विक्रीसाठी आपल्या ताब्यात बाळगून असताना स्थानिक गुन्हे शाखा आणि शहर पोलिसांनी ताब्यात घेतले. ही कारवाई बुधवार 30 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 5.10 वा. करण्यात आली.

फैसल मकसूद म्हसकर (रा.कर्ला जामा मशिदजवळ, रत्नागिरी) असे संशयिताचे नाव आहे. फैसल म्हसकरला उपविभागीय दंडाधिकारी यांनी महाराष्ट्र पोलिस अधिनियम 1951 चे कलम 56(1) (अ) अन्वये रत्नागिरी, सिंधुदुर्ग, व कोल्हापूर जिल्हयातून 2 वर्षांसाठी हद्दपार केले होते. हद्दपार असतानाही आरोपी फैसल म्हसकरने कोणत्याही सक्षम प्राधिकार्‍याची परवानी न घेता रत्नागिरीत येउन सरकारी पॉलीटेक्निकचे मागील बाजुस गांजा विकताना मिळून आला. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखा आणि रत्नागिरी शहर पोलिसांनी मिळून केली.
त्याच्या विरोधात पोलिस हेड काँस्टेबल शांताराम झोरे यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार, संशयित फैसल म्हसकर हा बुधवारी सायंकाळी थिबा पॅलसे येथील सरकारी पॉलीटेक्निकच्या मागील रस्त्यावर विक्रिसाठी आपल्या ताब्यात 1 लाख 21 हजार 740 रुपयांचा गांजा बाळगून असताना ही कारवाई करण्यात आली. त्याच्याकडून 10 हजारांचा एक मोबाईलही हस्तगत करण्यात आला. त्याच्या विरोधात एन.डी.पी.एस अ‍ॅक्ट 1985 चे कलम 8(क),20(ब) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.