चोरट्याने लांबवली रेल्वे कर्मचाऱ्याचीच दुचाकी

राजापूर:- राजापूर रोड रेल्वेस्टेशन येथे रेल्वे कर्मचाऱ्याची दुचाकी भर दिवसा चोरीला गेली. राजापूर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना मंगळवारी (ता. २२) सकाळी दहाच्या सुमारास निदर्शनास आली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार तालुक्यातील मोसम राणेवाडी येथील शशिकांत राणे हे रेल्वे विभागात ट्रकमन म्हणून कार्यरत आहेत. मंगळवारी दुचाकीने राजापूर रेल्वेस्टेशन येथे कामावर हजर झाले. रेल्वे स्टेशनच्या बाहेरच्या बाजूला रेल्वे कर्मचाऱ्यांना गाड्या लावण्यासाठी शेड असून त्याठिकणी त्यांनी आपली दुचाकी पार्क करून ते कामासाठी निघून गेले. सायंकाळी ड्युटी संपल्यानंतर सात च्या सुमारास ते शेड ठिकाणी आले असता दुचाकी (क्र.एमएच-०८एम ०३१३) दिसून आली नाही. त्यांनी आजुबाजूला शोध घेण्याचा प्रयत्न केला असता दुचाकी आढळून आली नाही. या प्रकरणी राणे यांनी राजापूर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.