परतीच्या पावसाने भातशेतीचे मोठे नुकसान; अनेक भागात भातपीक आडवे

रत्नागिरी:-  पावसाचे चार महिने उलटून गेले तरी पाऊस थांबण्याचे नाव घेत नाही. या वर्षी ऑक्टोबरमध्ये देखील ऑगस्टसारखा पाऊस लागत आहे. यामुळे तयार झालेेले भातपीक आडवे झाले आहे. शेतकर्‍यांना याचा मोठा फटका बसला असून भातशेतीचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी पावसाने शंभर टक्के सरासरी ओलांडली असून अजूनही रोज पावसाची बरसात सुरू आहे.

भातपीक आता कापणीला आले आहे. हळवे भातपीक पावसातच शेतकर्‍यांनी कापले. आता उशिरा होणारे भातपीक देखील आता कापणीला आले आहे. मात्र, पाऊस थांबण्याचे नाव घेत नसल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. अनेक भातशेतीच्या खाजणात पाणी साचलेले असून तयार झालेले भातपीक कापायचे कसे? हा शेतकर्‍यांसमोर प्रश्न आहे. शिवाय अनेक ठिकाणी तयार झालेल्या भातपिकाचे बुंधे पाण्यात कुजून तयार भातपीक आडवे झाले आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात भातपिकाचे दाणे गळू लागले आहेत. यामध्ये शेतकर्‍यांचे मोठे नुकसान होत आहे.
दररोज दुपारनंतर पाऊस सुरू होत आहे. विजांचा कडकडाट आणि आकाशात काळे ढग जमून ऑगस्टसारखा पाऊस कोसळत आहे. रात्रीच्यावेळी देखील मोठ्या प्रमाणात पाऊस येत असून सकाळच्या वेळेत दोन ते तीन तास शेतकर्‍यांना भात कापणीसाठी मिळत आहेत तर सायंकाळी पाऊस आल्याने कापलेले भातपीक बांधून घरी आणेपर्यंत ते भिजत आहे. त्यामुळे भातपिकाला ऊन मिळणेदेखील मुश्कील झाले आहे. आत्तापर्यंत जिल्हाभरात सरासरी 3 हजार 364 मि.मी. पावसाची नोंद झाली असून दापोली, गुहागर, चिपळूण, संगमेश्वर, लांजा, राजापूर या तालुक्यात सरासरीपेक्षाही अधिक पाऊस झाला असून या ठिकाणी पावसाने शंभर टक्केची सरासरी ओलांडली आहे.

दररोज सायंकाळी पाऊस येत असल्याने ग्रामीण भागातील शेतकरी हवालदिल झाला आहे. भातपिकाचे मोठे नुकसान होत असून ते वाळवायचे कसे हा प्रश्न आहे. या शिवाय कापणी, वाळवणी, झोडणी या कामात पावसाचा व्यत्यय येत असून शेतकरी चिंतातूर झाला आहे. दुसर्‍या बाजूला शेतामध्ये भातपीक आडवे झाले असून नुकसान देखील सहन करावे लागत आहे.