जिल्ह्यात महिलांवर अत्याचाराच्या गुन्ह्यात वाढ

रत्नागिरी:- जिल्ह्यात महिलांसंबंधित गुन्ह्यांमध्ये मोठी वाढ झाली आहे.जानेवारी ते ऑगस्ट या आठ महिन्यांच्या कालावधीत महिलांवरील अत्याचाराचे १५३ गुन्हे दाखल झाले आहेत. त्यापैकी १४६ गुन्हे उघड झाले आहेत; परंतु यामध्ये सर्वाधिक ३० गुन्हे बलात्कार आणि अपहरणाचे आहेत. त्यामुळे पोलिस यंत्रणेपुढे मोठे आव्हान उभे आहे.

जिल्ह्यात गेल्या आठ महिन्यात महिलांविषयक दाखल गुन्ह्यांमध्ये बलात्काराच्या गुन्ह्याची दाखल संख्या सर्वाधिक ३० इतकी आहे. हे सर्व गुन्हे पोलिसांनी उघड केले आहेत. त्या खालोखाल अपहरणाचे गुन्हे २६ आहेत. त्यापैकी २१ गुन्हे उघड झाले आहेत. गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे. तपासासाठी पोलिस आधुनिक सुविधांचा वापर करत असल्यामुळे गुन्ह्यांची उकल होण्यास चांगली मदत होत आहे.
रत्नागिरी जिल्हापूर्वी शांत जिल्हा म्हणून ओळखला जात होता. महिलांसाठीही अतिशय सुरक्षित असे वातावरण होते. त्यामुळे महिला, मुली निर्भयपणे बाहेर पडत होत्या. इतरही गुन्ह्यांचे प्रमाण तसे कमी होते; मात्र, आता वातावरण बदलले आहे. इतर जिल्ह्यांच्या तुलनेत रत्नागिरी जिल्ह्यात गुन्हेगारीचे प्रमाण कमी असले तरी अलिकडच्या काळात गुन्हेगारी वाढू लागली आहे. त्यामुळे पोलिस यंत्रणेलाही अधिक सजग राहावे लागत आहे. कोकण रेल्वे आल्यानंतर कोकणचा विकास होऊ लागला. व्यवसाय, नोकरी, पर्यटन या निमित्ताने रत्नागिरीत येणाऱ्यांची संख्या वाढली आहे. रत्नागिरीतील औद्योगिक क्षेत्रात कामाला येणारा कामगारवर्ग मोठ्या संख्येने बाहेरून येतो. इतर मोठ्या जिल्ह्यांशी रत्नागिरी जिल्ह्याचा सहज संपर्क येतो. बाहेरून येणाऱ्यांच्या वाढत्या संख्येने गुन्ह्यांचे प्रमाणही वाढले आहेत. हे गुन्हे स्थानिकांकडून घडण्याची संख्या कमी आहे.