रत्नागिरी:- टपरीवर चहा पिण्यासाठी गेलेल्या तरुणाला अस्वस्थ वाटू लागल्याने त्याला अधिक उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला तपासून मृत घोषित केले.
वैभव चंद्रकांत सुतार (वय ३२, रा. तेरेमुरली, ता. संगमेश्वर, रत्नागिरी) असे मृत तरुणाचे नाव आहे. ही घटना बुधवारी (ता. २३) सायंकाळी सातच्या सुमारास जिल्हा रुग्णालयात घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार वैभव हा खबर देणार यांच्या टपरीवर चहा पिण्यासाठी गेला होता. त्याने मद्य प्राशन केले होते. तेथील कडप्यावर डोके टेकून बसला असता त्याला पाण्याच्या उलट्या झाल्या. खबर देणार यास आपली तब्बेत बरी नसल्याचे वैभवने सांगितले. तात्काळ त्याने वैभवच्या नातेवाईक उदय चंद्रकांत पांचाळ याना बोलावून घेतले. प्रथम त्याला खासगी डॉक्टरकडे नेले. अधिक उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले. ग्रामीण पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.