20 नोव्हेंबरला मतदान; 23 रोजी मतमोजणी
मुंबई:- संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचं बिगुल अखेर वाजलं असून, केंद्रीय निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी पत्रकार परिषदेत सविस्तर कार्यक्रम आज (दि.15) जाहीर केला आहे. जाहीर करण्यात आलेल्या कार्यक्रमानुसार महाराष्ट्रात 20 नोव्हेंबरला एकाच टप्प्यात निवडणुका पार पडणार आहेत. तर, मतमोजणी होऊन निकाल 23 नोव्हेंबरला घोषित केले जाणार आहेत.
शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन प्रमुख पक्ष फुटल्यानंतर ही पहिली विधानसभेची निवडणूक होत आहे. यामुळे राज्याच्या राजकारणासाठी ही निवडणूक महत्त्वाची असणार आहे. निवडणुकांच्या तारखांची घोषणा झाल्याने आजपासून आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे.
या आधी म्हणजे 2019 मध्ये महाराष्ट्र आणि हरियाणामध्ये 21 ऑक्टोबर रोजी एकाच टप्प्यात मतदान पार पडले होते. तर, 24 ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर करण्यात आले होते. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, सत्तास्थापनेसाठी 145 चे बहुमत आवश्यक आहे. गेल्यावेळी म्हणजे 2019 च्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपाला 105, शिवसेना- 56, राकांपा- 54, काँग्रेस – 44 अपक्ष – 13 तर, अन्य- 16 जागा मिळाल्या होत्या.
तर, 2019 मध्ये झारखंड विधानसभा निवडणूक पाच टप्प्यात झाली होती. यात पहिला टप्पा 30 नोव्हेंबर, दुसरा 7 डिसेंबर, तिसरा 12 डिसेंबर, चौथा 16 डिसेंबर आणि पाचव्या टप्प्यातील मतदान 20 डिसेंबर रोजी झाले होते. त्यानंतर 23 डिसेंबर रोजी मतमोजणी होऊन निकाल घोषित करण्यात आले होते.