पाच महिन्यात ३८० जणांना सर्पदंश, दीड हजार जणांना श्वानदंश

२ हजार ३५२ जणांना जंगली प्रण्यांकडून चावा

रत्नागिरी:- जिल्ह्यात एप्रिल ते ऑगस्ट पाच महिन्याच्या कालावधीत 380 जणांना सर्पदंश झाला. या सर्वांचे प्राण वाचले. त्याचबरोबर 1 हजार 409 जणांना कुत्र्याने तर 2 हजार 352 जणांना इतर प्राण्यांनी चावा घेतला होता. या सर्वांचे प्राण वाचवण्यात रुग्णालयातील डॉक्टरांना यश आले आहे.

सर्पदंश झालेल्या रुग्णांवर प्रामुख्याने एएसव्ही इंजेक्शनद्वारे उपचार करण्यात आल्याने सर्पदंश झालेल्यांचे प्राण वाचू शकले. दरम्यान, अशा रुग्णांच्या दृष्टीने रुग्णालयात या औषधीचा साठा मुबलक प्रमाणात उपलब्ध असल्याची माहिती रुग्णालयाच्या सूत्रांनी दिली आहे.
जिल्ह्यात सर्वाधिक लोकसंख्या ही ग्रामीण भागात असून, त्यामध्ये बहुतांश लोक शेती आणि शेतीपूरक व्यवसाय करणारे आहेत. शेतकर्‍यांना रात्री-अपरात्री शेतात जावे लागते. अशा वेळी साप चावल्याच्या अनेक घटना घडतात. मात्र, प्रत्येक साप विषारी असतो असे नाही. महाराष्ट्रात सापांच्या 52 प्रजाती आहेत. त्यामध्ये केवळ 12 प्रजाती विषारी आहेत, तर 40 जाती बिनविषारी आहेत. तसेच नागरी वस्तीकडे आपले भक्ष्य शोधण्यासाठी येणार्‍या सापांच्या जाती या चार असून, त्यामध्ये घोणस, फुरसे, नाग आणि मण्यार यांचा समावेश आहे. त्यामुळे कोणताही साप चावल्याने मृत्यू होतो असे गृहीत धरणे चुकीचे असल्याचे सर्पविषयक तज्ज्ञ आणि सर्पमित्रांकडून सांगितले जाते. जिल्ह्यात मागील पाच महिन्याच्या कालावधीत 380 जणांना सर्पदंश झाला होता. सर्पदंश झालेल्या 380 जणांना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या सर्वांचे प्राण वाचवण्यात यश आले.

सापांबरोबर इतरही प्राण्यांनी चावा घेतल्याची संख्या जिल्ह्यात जास्त आहे. यामध्ये विषारी विंचू तसेच इंगली, माकड, मांजर यांचा समावेश आहे. गेल्या पाच महिन्यात 2 हजार 352 जणांना इतर प्राण्यांनी चावा घेतला आहे. त्याचबरोबर सध्या जिल्ह्यात भटक्या कुत्र्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. भटक्या कुत्र्यांची संख्या ही दिवसेंदिवस वाढत जात आहे. गेल्या पाच महिन्यात 1 हजार 409 जणांना कुत्र्याने चावा घेतला आहे. यांच्यावर औषधोपचार करण्यात आले आहेत.