रत्नागिरी:- भाड्याच्या पैशावरुन शिवीगाळ व मारहाण करणाऱ्या दोंघांविरुद्ध ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अतुल हनुमंत लाड (रा. आरटीओ रोड, रत्नागिरी) व सागर किशोर पालकर (रा. पांडवनगर-नाचणे, रत्नागिरी) अशी संशयितांची नावे आहेत. ही घटना २९ सप्टेंबरला सायंकाळी सातच्या सुमारास गयाळवाडी निलांबरी अपार्टमेंट येथे व रात्री सव्वा आठच्या सुमारास पानवल फाटा येथे घडली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सुशांत रवींद्र हिरे (वय ३६, रा. गयाळवाडी, निलांबरी अपार्टमेंट-रत्नागिरी) हे सायंकाळी सात च्या सुमारास घरी असताना संशयित अतुल लाड याने फिर्यादी यांच्या घरी येऊन भाड्याचे राहिलेले पैसे मागु लागला. तेव्हा फिर्यादी त्यांच्या सोबत बिल्डींगच्या खाली आले. त्यावेळी संशयित अतुल व सागर यांनी भाड्याच्या पैशावरुन शिवीगाळ व मारहाण केली. या बाबत फिर्यादी यांनी व्यवहाराचे मध्यस्थी करणारे अमित देसाई यांना सर्व हकीगत सांगितली म्हणून पुन्हा फिर्यादी यांना संशयितांनी हातखंबा गद्रे पेट्रोलपंप या ठिकाणी बोलावले म्हणून फिर्यादी हे त्यांची रिक्षा (क्र. एमएच-०८ एक्यू ९५६४) घेऊन हातखंबा येथे गेले. तेथे व्यवहारावरुन तडजोड झाली आणि फिर्यादी परत घरी येत असताना संशयितांनी पुन्हा फिर्यादी यांच्या रिक्षा समोर दुचाकी आडवी लावून संशयित अतुल लाड याने रस्त्यावरील दगड फेकुन मारला तो फिर्यादी यांच्या पाठीवर लागला. तर सागर याने रस्त्यावरील चिव्याच्या बांबुने फिर्यादी यांना पाठीवर व कमरेवर मारहाण केली. या प्रकरणी सुशांत हिरे यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी दोघा संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.