धामणसे येथे दोन गटात जोरदार हाणामारी; 2 जण जखमी, 8 जणांवर गुन्हा

रत्नागिरी:- शहरानजिकच्या धामनसे येथे दोन शेजारमध्ये झालेल्या जोरदार हाणामारीत दोन जखमी झाले.जलस्वराज्य योजनेच्या पाईपलाईनवरून पाणी चोरून घेण्याच्या गैरसमजातून रत्नागिरी तालुक्यातील धामणसे येथे शेजाऱ्या शेजाऱ्यामध्ये जोरदार जुंपली. एकमेकांवर दगडफेक करत मारहाण झाल्याचा प्रकार घडला. याप्रकरणी रत्नागिरी ग्रामीण पोलिसांकडे परस्पर विरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. त्यानुसार एकूण आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना 10 ऑगस्ट रोजी सायंकाळी घडली आहे. धामणसे येथे श्रीमती लिलावती लक्ष्मण लोगडे व चंद्रकांत कृष्णा लोगडे हे एकमेकांचे शेजारी राहतात. लिलावती यांनी दिलेल्या तक्रारीनुसार श्रीकांत चंद्रकांत लोगडे, चंद्रकांत कृष्णा लोगडे, दिपक लोगडे, संतोष महादेव लोगडे यांनी वाडीतील लिलावती
लोगडे ह्या जलस्वराज्य पाणी योजनेचे लाईनमधून चोरून पाणी घेतात असा मनात गैरसमज करून घेतला होता. त्यामुळे पाणी लाईन चरसाठी त्यांनी लिलावती यांच्या घरासमोरील बाजूस जमीन खोदाई सुरू केली. गणपती सण असल्याने आता जमीन खोदू नका असे सांगितल्याच्या रागातून लिलावती यांचा मुलगा महेश याच्या नाकावर श्रीकांत लोगडे याने जांभा दगड मारून दुखापत केली. ही मारामारी होत असताना लिलावती या सोडवण्यासाठी गेल्या असता चंद्रकांत व संतोष यांनी त्यांनाही धक्काबुक्की करत मारहाण केली. त्यांचा मुलगा अनिकेत यास देखील धक्काबुक्की केली. तसेच लिलावती यांचा दिर सुभाष विठ्ठल लोगडे यांनाही जोरदार मारहाण करत शिवीगाळ करून धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

तर चंद्रकांत कृष्णा लोगडे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, वाडीतील जलस्वराज्य पाणी योजनेचे नळ कनेक्शन बंद करण्यासाठी रस्त्यावर खड्डा खोदत असताना महेश लक्ष्मण लोगडे यांनी शिवीगाळ केली. त्यावेळी खोदकाम थांबवून परत घरी जात असताना हनुमान मंदिराचे पुढील बाजूस येताच महेश याने दगड फेकून मारला. तो मारलेला दगड तेजस्वी विजय लोगडे यांचे डावे हाताला लागून त्या जखमी झाल्या. याची विचारणा केली म्हणून चंद्रकांत यांना व सोबत असलेल्या ग्रामस्थांना शिवीगाळ व धक्काबुक्की करून जमिनीवर पाडले. तर अनंत सोनू लोगडे याने अमोल गणेश लोगडे यांना हाताच्या ठोशांनी पाठीवर जोरदार मारहाण केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

या प्रकरणी रत्नागिरी ग्रामीण पोलिसांकडे परस्पर विरोधी तक्रारी दाखल झाल्या आहेत. त्यानुसार लिलावती लोगडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी श्रीकांत लोगडे, दिपक लोगडे, संतोष लोगडे, चंद्रकांत लोगडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तर चंद्रकांत लोगडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून महेश लोगडे, ओंकार सुरेश लोगडे, सुनील सुरेश लोगडे, अनंत सोनु लोगडे यांच्याविरेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.