शितप बंधूंनी साकारला देखावा; पंचक्रोशीतून देखावा पाहण्यासाठी गर्दी
रत्नागिरी:- वाटद येथील प्रस्तावित एमआयडीसीला असलेला तीव्र विरोध दर्शवण्यासाठी येथील शितप बंधूंनी घरगुती गणेशोत्सवात एमआयडीसी विरोधातील देखावा साकारला आहे. एका बाजूला निसर्गसंपन्न वाटद गाव तर दुसऱ्या बाजूला प्रदूषणकारी एमआयडीसी प्रकल्प आल्यानंतर होणारी अवस्था या देखाव्याच्या माध्यमातून मांडण्यात आली आहे. हा देखावा पाहण्यासाठी गावातील ग्रामस्थांसह आजूबाजूच्या परिसरातील ग्रामस्थ देखील हजेरी लावत आहेत. तसेच सोशल मीडियावर देखील या देखाव्याला प्रचंड प्रसिद्धी मिळत आहे.
राज्य शासनाकडून वाटद येथे एमआयडीसी प्रस्तावित करण्यात आली आहे. वाटदसहित कोळीसरे, कळझोंडी, गडनरळ, वैद्यलागण ,मिरवणे या भागात ही एमआयडीसी उभारली जाणार आहे. या एमआयडीसीला येथील स्थानिक ग्रामस्थ आणि चाकरमानी यांनी कडाडून विरोध केला आहे. हाच विरोध वाटद शितपवाडीतील शितप बंधूं यांच्या मोठ्या घरी गणेशोत्सव देखाव्याच्या माध्यमातून दाखवण्यात आला आहे.
हा देखावा साकारताना एका बाजूला निसर्गसंपन्न वाटद गाव दाखवण्यात आले आहे. यामध्ये हिरवळीने नटलेली झाडे, गावातील पारंपरिक सौंदर्य, पिढ्यानपिढ्या सुरू असलेले उद्योग नैसर्गिक पाण्याचे स्त्रोत, भाजी शेती इतर व्यवसाय जैवविविधतेने नटलेले पूर्ण दाखवण्यात आले आहेत. तर दुसऱ्या बाजूला प्रदूषणकारी एमआयडीसी प्रकल्प उभारण्यात आल्या नंतर होणारा बदल दाखवण्यात आला आहे. प्रकल्प उभा राहिल्यानंतर होणाऱ्या प्रदूषणामुळे येथील निसर्गाची होणारी हानी कधीच भरून काढता येणार नाही. एमआयडीसी आली की कॅन्सर व इतर मोठे आजार तसेच हवेचे वायु व पाणी प्रदूषण आणि यामुळेच एमआयडीसी हटवा आणि कोकण वाचवा असा संदेश या देखाव्याच्या माध्यमातून देण्यात आला आहे.
येथील स्थानिक ग्रामस्थ आणि मुंबईतून गावात दाखल झालेल्या चाकरमानी यांचा प्रचंड प्रतिसाद या देखाव्याला लाभला आहे. सोशल मीडियावर देखील हा देखावा तरुणाईच्या पसंतीस उतरला आहे. फेसबुक, इंस्टाग्राम आणि व्हॉट्स ॲप वर अनेकांनी या देखाव्याचा स्टेटस ठेवून एमआयडीसीला आपला विरोध किती तीव्र आहे हे दाखवून दिले आहे.
मा.उद्योग मंत्री, पालकमंत्री ना. उदय सामंत यांनी खंडाळा येथील जाहीर सभेत वाटद एमआयडीसी होणार नाही.वाटद एमआयडीसी अधिसूचना रद्द करण्यात येईल, असा शब्द देऊन तो त्यांनी पूर्ण केला. त्याबद्दल वाटद गावातील व इतर पाच गावातील ग्रामस्थ चाकरमानी यांनी ना. सामंत यांचे शतशः आभारी आहोत. गावातील ग्रामस्थांचे आशीर्वाद तसेच कायम सदैव त्यांच्या पाठीशी उभे राहू अशी भूमिका घेतली आहे.
– वाटद एमआयडीसी विरोध संघर्ष समिती