उबाठा शिवसेनेची पालकमंत्र्यांकडे मागणी
रत्नागिरी:- रत्नागिरीच्या शासकीय तंत्रनिकेतनमध्ये प्रवेश मिळवून स्थापत्य अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शिकवायला अधिव्याख्यातेच नाहीत. मेकॅट्रॉनिक्स हा अभ्यासक्रम 2023-24 मध्ये पहिली बॅंच पदविका धारण करून बाहेर पडली. तरी अजूनही अभ्यासक्रमासाठी पायाभूत सुविधांसह अधिव्याख्यांत्यांची वानवा आहे. मंजूर पदांपेक्षा 50 टक्के पेक्षा कमी अधिव्याख्याते संस्थेत कार्यरत आहेत. रिक्त पदांमुळे तासिका तत्वावर अभ्यागत अधिव्याख्यात्यांची नेमणूक करून काम चालविले जाते.शासनाने तासिका तत्वावरील अध्यापकांच्या नियुक्तीही थांबविल्याने इंजिनिअरिंगचे स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला लागले आहे.तर दुसरीकडे मागिल शैक्षणिक वर्षात तासिका तत्वावर विद्यार्थ्यांना शिकविणाऱ्या अधिव्याख्यांत्यांना सप्टेंबर 2023 पासूनचे मानधन दिले गेले नसल्याची गंभीर बाब पुढे आली आहे. यांची गंभीर दखल घेवून तात्काळ प्राध्यपकांची रिक्त पदे भरण्यात यावी अशी मागणी शिवसेना शहर संघटक, तालुका युवा अधिकारी प्रसाद सावंत यांनी पालकमंत्री ना.उदय सामंत यांच्याकडे केली आहे.
रत्नागिरी शासकीय तंत्रनिकेतन संस्थेत मेकॅट्रॉनिक्स हा अभ्यासक्रम 60 च्या प्रवेशक्षमतेत सुरू करण्यात आला. शैक्षणिक वर्ष 2021-22 पासून हा अभ्यासक्रमास विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. शैक्षणिक वर्ष 2023-24 मध्ये पहिली बेंच पदविका धारण करून बाहेर पडली आहे. तरी या संस्थेच्या रिक्त पदाचा प्रश्न गंभीर आहे. या अभ्यासक्रमासाठी आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधा संस्थेस उपलब्ध नाहीत. विद्यार्थ्यांना वर्ग खोल्या, प्रयोगशाळा, त्यास लागणारी साधनसामुग्री, यंत्रसामुग्री उपलब्ध नाही. संस्थेतील 10 अभ्यासक्रमाच्या अनुषंगाने मंजूर पदे 79 आहेत. त्यापैकी 38 पदे भरण्यात आली आहेत. म्हणजे 50 टक्के पेक्षा कमी अधिव्याख्याते संस्थेत कार्यरत आहेत. रिक्त पदांच्या अनुषंगाने तासिका तत्वावर अभ्यागत अधिव्याख्यात्यांची नेमणूक करून सैध्दांतिक व प्रात्यक्षिक पूर्ण करून घेतली जातात. परंतु तासिका तत्वावरील अध्यापकांच्या नियुक्ती बाबतची कार्यवाही करण्यात येवू नये, असे शासनाने सूचित केले आहे. त्यामुळे रत्नागिरी तंत्रनिकेतन शिक्षकाविना असल्याची गंभीर बाब पुढे आली आहे. रत्नागिरी शासकीय तंत्रनिकेतनची रिक्त पदे भरुन विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळावे अशी मागणी प्रसाद सावंत, पारस साखरे, अमन राणे यांनी पालकमंत्री ना.उदय सामंत यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.