हिंगोलीतील तलाठी खून प्रकरणी जिल्ह्यात कामबंद आंदोलन

रत्नागिरी:- हिंगोली येथील आडगाव रंजे येथे तलाठी कार्यालयात एका तलाठ्याची हत्या केल्याच्या निषेधार्थ राज्य तलाठी व मंडळ अधिकारी समन्वय संघाने कामबंद आदोलन पुकारले आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तलाठी संघ सहभागी होऊन आंदोलन केले. अचानक केलेल्या आंदोलनामुळे तलाठी कार्यालयात आलेल्या लोकांना माधारी परतावे लागले.

आडगांव रंजे येथे संतोष पवार हे तलाठी कार्यालयात शासकीय कामकाज करत असताना भरदिवसा त्यांचा चाकूने भोसकून खून करण्यात आला. या घटनेचा रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्हा तलाठी संघाने निषेध व्यक्त केला आहे. मृत पवार यांचे संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झाले आहे. तलाठी यांचा कोणताही दोष नसताना केवळ संशयावरून एका कर्मचाऱ्याला जीव गमवावा लागला. या घटनेमुळे कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे, या घटनेचा निषेध म्हणून महाराष्ट्र राज्य तलाठी पटवारी मंडळ अधिकारी समन्वय महासंघ तसेच महाराष्ट्र राज्य तलाठी संघ यांनी गुरुवारी एकदिवसीय कामबंद आंदोलन केले. यामध्ये रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व तलाठी, मंडळ अधिकारी संवर्गातील अव्वल कारकून नायब तहसीलदार, तहसीलदार यांनी कामबंद आंदोलनात सहभागी होऊन आंदोलन यशस्वी केले. दाखल्यासाठी आलेल्या नागरिकांना मात्र माघारी जावे लागले.