रत्नागिरी:- गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर आला आहे. गणपती कारखान्यात मोठी लगबग सुरू आहे. गणेश मुर्त्यांचे रंगकाम अंतिम टप्प्यात आले आहे. मात्र याच कालावधीत अनेकवेळा होणाऱ्या खंडित वीज पुरवठ्यामुळे मुर्तिकाराना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. तरी गणेशोत्सव कालावधीत काळबादेवी, बसणी आणि कासारवेली या गावांमध्ये सुरळीत आणि अखंडित वीज पुरवठा सुरू ठेवावा अशी मागणी काळबादेवी शिवसेना शाखा प्रमुख संदेश बनप यांनी महावितरणचे अधीक्षक अभियंता यांच्याकडे निवेदनाव्दारे केली आहे.
गावागावात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. सर्वांचा लाडका असा हा उत्सव अवघ्या काही दिवसांवर आला आहे. काळबादेवी, बसणी आणि कासारवेली या भागात असणारे गणपती कारखाने मोठ्या संख्येने आहेत. या सर्व कारखान्यांमध्ये गणपती साकारण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. मात्र, वारंवार खंडीत होणारा वीज पुरवठा ही सर्व गणपती कारखान्यातील मूर्तीकारांसमोर गंभीर समस्या बनली आहे. बहुतांश कारखान्यात रात्री जागून मुर्टिकाम करण्याची परंपरा आहे. मात्र याचवेळी अचानक लाईट जात असल्याने मोठी समस्या निर्माण होत आहे. यामुळे गणेशोत्सव काळात या भागात वीज पुरवठा अखंडित सुरू ठेवावा अशी मागणी संदेश बनप यांनी केली आहे.