लांजा:- देवगडहून चिपळूणकडे जाणारा ४३ वर्षीय तरूण लांजा बसस्थानक येथून बेपत्ता झाल्याची फिर्याद लांजा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. ही घटना ९ ऑगस्ट रोजी रात्री १.४५ च्या सुमारास घडली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुळचा चिपळूण तालुक्यातील गोवळकोट भोईवाडी येथील रहिवासी असलेला प्रदीप शंकर भातवकर (४३) हा देवगड येथे कामाला असून तब्येत बरी नसल्याने तो ९ ऑगस्ट रोजी देवगडहून चिपळूण येथे आपल्या गावी चालला होता. त्याच्यासोबत त्याचा मित्र योगेश जनार्दन सैतवडेकर (३५, रा. गोवळकोट भोईवाडी) हा देखील होता. हे दोघे चिपळूण येथे जात असताना ९ ऑगस्ट रोजी रात्री लांजा येथे उतरल्यानंतर लांजा एसटी बसस्थानक येथील एका टपरीवर हे दोघेजण झोपले होते. यावेळी प्रदीप भातवकर हा काहीही न सांगता कुठेतरी निघून गेला. तो परत आला नाही, म्हणून मित्र योगेश सैतवडेकरने लांजा पोलीस ठाण्यात तो बेपत्ता झाल्याची फिर्याद दाखल केली. प्रदीप याची उंची ५ फूट ५ इंच, चेहरा गोल, रंग गोरा, केस बारीक, अंगावर सफेद रंगाचा टी- शर्ट, काळ्या रंगाची फुल पॅन्ट, डाव्या हातावर मालती असे मराठीत गोंदलेले आहे. तसेच तोंडात खालील चार दात पडलेले असून उजव्या हाताच्या मनगटात काळ्या रंगाचा रबर आहे. तरी ही व्यक्ती कोणाला आढळल्यास त्यांनी लांजा पोलीस ठाण्यात संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल राजेंद्र कांबळे हे करत आहेत.