खेड:- मुंबई-गोवा महामार्गावरील भरणे येथील श्री काळकाई देवी मंदिराजवळील खवले मांजर तस्करीप्रकरणात वनविभागाच्या पथकाने आतापर्यंत चौघांच्या मुसक्या आवळल्या. या तस्करीप्रकरणात आणखी एकाचा सहभाग असल्याची माहिती समोर आली आहे. या संशयिताच्या मुसक्या आवळण्यासाठी दापोली परिक्षेत्र वनाधिकारी प्रकाश पाटील व पथकाने कंबर कसली आहे. या संशयिताच्या अटकेनंतर खवले मांजराच्या हत्येसह तस्करीचे नेमके कनेक्शन उघड होण्याची शक्यता आहे.
५ महिन्यापूर्वी वनविभागाच्या पथकाने खवले मांजर तस्करीप्रकरणी आतिष अशोक सोनावणे (तुळशी बुद्रुक बौद्धवाडी), अनिल धोंडूराम जाधव (नागाव-महाड), राजेंद्र रघुनाथ मोरे (दिवीळ-पोलादपूर) यांच्या मुसक्या आवळल्या होत्या. त्यांच्याकडून खवले मांजरासह वाहतुकीसाठी वापरलेली वाहनेही हस्तगत केली होती.
या प्रकरणात गेल्या ५ महिन्यांपासून गुंगारा देणाऱ्या दत्ताराम शामा कोंडके यालाही महाड येथील राहत्या घरातून वनविभागाच्या पथकाने गजाआड केले. या संशयिताची जामिनावर सुटका झाली. मात्र
त्याच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, खवले मांजर तस्करीप्रकरणात आणखी एकाचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे.
त्या संशयिताचे वनविभागाच्या पथकाला नावही समजले असून त्याच्याही मुसक्या आवळण्यासाठी पथकाने व्यूहरचना आखली आहे. या संशयिताच्या अटकेनंतर तस्करीप्रकरणाचे नेमके कनेक्शन उघड होण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने वनविभागाचे विभागीय वनाधिकारी गिरीजा देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली दापोली परिक्षेत्र वनाधिकारी प्रकाश पाटील व पथकाकडून पुन्हा सखोल तपास करण्यात येत आहे.