रत्नागिरी:- आगामी श्रावण महिना म्हणजे उपवासाचा महिना. यामुळे आखाडात महागलेला भाजीपाला आता श्रावणातही कडाडण्याची भीती आता महिला वर्गातून वर्तविण्यात येत आहे.
महागाईमुळे जीवनावश्यक वस्तूंचे दर भडकले आहेत. कडधान्य, डाळींचे दर आधीच वाढलेले आहेत. त्यातच भाज्यांचे दर भाव खात आहेत. त्यामुळे ग्राहकांना भुर्दंड बसत आहे. गेले दोन महिने भाज्यांच्या दरांनी उच्चांक गाठला आहे. कडधान्यांचेही दर वाढलेले असले, तरी दोन महिने दर स्थिर आहेत. तेलाचे दरही बेताचे आहेत.
आठवडाभरात श्रावण सुरू होत आहे. सणासुदीचे दिवस सुरू होत असून, या काळात भाज्या, फळांचा खप होतो. सात्विक आहारामुळे तेल, तूप, डाळी, कडधान्यांचाही खप होतो. दरवाढीमुळे ग्राहकांना फटका बसतो. भाज्यांचे दर कडाडलेले असून, किराणाचे दर स्थिर असले, तरी भडकलेलेच आहेत. शासन एकीकडे विविध योजना जाहीर करून सर्वसामान्यांना पैशाची भुरळ घालत आहे. त्यामुळे लाडकी बहिणीसारखी योजना राबवून एका हाताने दिल्यासारखे करायचे तर दुसर्या हाताने काढून घ्यायचे ही क्लृप्ती शासनाने वापरली आहे की काय असा सवाल आता महिला वर्गातून उपस्थित केला जात आहे.
गेल्या दोन आठवड्यापासून कांदा, बटाटा, लसूण दरात वाढ झाली आहे. कांदा 50 ते 55 रुपये तर बटाटा 45 रुपये किलो दराने विकण्यात येत आहे. 100 रुपयांना दोन किलो कांदे, तर बटाटे अडीच किलोप्रमाणे विकण्यात येत आहे. लसूण दरात किलोमागे शंभर रुपयांची वाढ झाली असून, 400 रुपये किलो दराने विकण्यात येत आहे. दरवाढीचा फटका सर्वांनाच बसत आहे.