प्रश्न मांडण्याचा लोकशाहीने दिलेला अधिकार, हा अधिकार कोणी काढू शकत नाही: राजेश सावंत

रत्नागिरी:- प्रश्न मांडण्याचा अधिकार लोकशाहीने दिला आहे. हा अधिकार कोणीही काढून शकत नाही. त्यामुळे अशा गोष्टी करणे फार चुकीचे ठरेल. कोणालाही व्यथा, अडचणी पूर्णपणे मांडू द्याव्यात. चांगले वातावरण राहिले पाहिजे, याकरिता सर्वच राजकीय पक्षांनी भूमिका घ्यावी. एका पक्षाने आक्रमक भूमिका घेतल्यास अन्य पक्षसुद्धा आक्रमक भूमिका घेतील. पण अशाने राजकीय शांतता बिघडेल. भाजपा हा देशातील व महाराष्ट्रातील मुख्य
पक्ष आहे, त्यामुळे आम्ही संयम पाळून आहोत, परंतु आमच्या संयमाचा कोणीही गैरफायदा घेऊ नये, असे वक्तव्य राजेश सावंत यांनी पत्रकारांशी
बोलताना सांगितले.

जिल्ह्यात रेशन दुकानावर धान्य मिळत नसल्याने ती समस्या घेऊन श्री. सावंत व भाजपा पदाधिकारी जिल्हाधिकारी कार्यालयात आले होते. त्याप्रसंगी बोलताना सावंत यांना रविवारी मी रत्नागिरीकर परिवाराने बोलावलेल्या बैठकीविषयी व त्यात सामंत समर्थकांनी बैठक उधळल्याबाबत प्रश्न विचारला असता सावंत बोलत होते. ते म्हणाले की, कुठल्याही रत्नागिरीकरांना भूमिका मांडण्याचा किंवा समस्या मांडण्याचा अधिकार आहे. या समस्या
सुटाव्यात, ही प्रत्येक रत्नागिरीकराची इच्छा आहे. जनतेला बोलायला दिले पाहिजे, हा अधिकार काढून घेणे योग्य नाही. आपणच आपली भूमिका पुढे रेटणे योग्य नाही.

रत्नागिरी शहरात सर्वच रस्त्यांवर भरपूर खड्डे पडले. या खड्ड्यांविषयी 25 दिवसांपूर्वी भाजपाने निवेदन दिले. खड्डे, मोकाट गुरे, याबाबत त्यात मागण्या मांडल्या होत्या. त्यानंतर कार्यवाही न झाल्याने आंदोलन केले. आज परत मुख्याधिकारी तुषार बाबर यांना भेटलो. त्यावेळी त्यांनीही 5 ऑगस्टपर्यंत बरेचसे खड्डे बुजवले जातील, असे आश्वस्त केले आहे. पालिकेकडे पुरेसे डांबर, आरएमसी उपलब्ध आहे, असे श्री. बाबर यांनी सांगितले आहे.