जिल्ह्यात कोरोनाचा स्थानिक संसर्ग सुरू झाल्याचा संशय? 

घरातून बाहेर न पडता राजीवड्यात महिलेला लागण 

रत्नागिरी:- जिल्ह्यातील कोरोनाचा आता स्थानिक संसर्ग सुरू झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. राजिवडा येथील नागरिकांनी यावरूनच गोंधळ घातला होता. गर्भवती महिला घरातून बाहेरच पडली नाही, मग तिला कोरोना झाला कसा? असा सवाल उपस्थित करत चिंता वाढविणारी बाब पुढे आली. जिल्ह्यात कोरोनाबाधितांनी 1300 आकडा पार केला आहे तर चार महिन्यामध्ये कोरोनाने 42 जणांचा बळी घेतला आहे. सर्वाधिक मृतांची संख्या दापोली तालुक्यातील असून त्या खालोखाल रत्नागिरी आणि चिपळूण तालुका आहे.

तालुक्यातील जयगड येथील महिला पोलिस कर्मचार्‍याबाबतही असाच प्रकार घडला होता. मात्र त्या महिलेला अन्य आजार असल्याने त्याकडे तेवढे गांभीर्याने लक्ष देण्यात आले नाही; मात्र अनेक अशा घटना आहेत, की त्याला मुंबई, पुणे किंवा अन्य जिल्ह्याचा कोणताही इतिहास नसताना कोरोना पॉझिटिव्ह आलेली अनेक उदहारणे आहेत. यापूर्वी क्वारंटाईन कक्षातील किंवा अन्य जिल्ह्यातून आलेल्यांना कोरोनाची बाधा झाल्याचे आकडे पुढे येत होते. आता कंटेन्मेंट झोन किंवा बाधितांशी संबंध न येता स्थानिक पातळीवर कोरोनाची बाधा झालेले रुग्ण सापडू लागले आहेत. याबाबत आरोग्य विभागाला आता अधिक सतर्क राहण्याची वेळ आली आहे.

घरडा कंपनीमध्येही मोठ्या संख्येने रुग्ण सापडू लागले आहेत. तिथेही स्थानिक पातळीवर संक्रमण वाढत चालले आहे. आगामी काळात गणेशोत्सवासाठी जिल्ह्यात मोठ्या संख्येने चाकरमानी येण्याची शक्यता आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवर कोरोनाचा संसर्ग होत असल्याचा संशय नागरिकांचा असला तरी ते रोखण्यासाठी आरोग्य विभाग आणि जिल्हा प्रशासनाने योग्य ती पावले उचलण्याची गरज आहे. कोरोनाचे आता तेराशेच्यावर बाधित रुग्ण झाले आहेत. त्यापैकी 42 रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला आहे तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही चांगले आहे.