रत्नागिरी:- येथील न्यायालयात साक्षीसाठी आलेल्या साक्षीदारावर संशयित आरोपीने न्यायालयाच्या आवारात कोयतीने वार केला. यामध्ये साक्षीदार जखमी झाला. उपचारासाठी त्याला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले असून शहर पोलिस ठाण्यात संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
स्वरुप जयसिंग राऊत (रा. हरचेरी, रत्नागिरी) असे संशयिताचे नाव आहे. ही घटना गुरुवारी (ता. २७) सकाळी अकराच्या सुमारास न्यायालयाच्या आवारात घडली. मिळालेल्या माहितीनुसार गुरुवारी न्यायालयात फिर्यादी योगेश चाळके (रा. चाळकेवाडी, रत्नागिरी) हे साक्षीसाठी आले होते. तर केसमधील संशयित असलेले आरोपी स्वरुप राऊत व जयसिंग राऊत (दोघेही रा. हरचेरी, रत्नागिरी) हे दोघेही न्यायालयात उपस्थित होते.
संशयित स्वरुप व जयसिंग राऊत यांचा योगेश चाळके यांच्यावर राग होता. एका केसमध्ये चाळके हे साक्षीदार होते. त्यामुळे चाळके यांच्यावर त्यांनी डुख ठेवला होता. न्यायालयात येताना संशयितांनी पिशवीतून कोयता आणला होता.
दोघेही साक्ष देऊन बाहेर पडले. तसेच न्यायालयात योगेश चाळके हे आपली साक्ष देऊन कोर्ट रुममधून बाहेर आले आणि ते पॅसेजमधून पुढे चालत जात होते. त्याचवेळी कोर्टरुममधून बाहेर आलेल्या संशयित स्वरुप राऊत याने योगेश चाळके यांचा पाठलाग केला आणि पिशवीतून कोयता काढून चाळके यांच्या पाठीवर कोयत्याने वार केला.
योगेश चाळके यांच्यावर न्यायालयाच्या आवारात आरोपीने कोयत्याने हल्ला केल्यानंतर वकिलांसह पक्षकारांमध्ये घबराट निर्माण झाला. यावेळी न्यायालयात ड्युटीवर असलेल्या पोलिसांनी वेळीच धाव घेतली आणि पुढील मोठी घटना टळली.
बाप व मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले
जखमी झालेल्या योगेश चाळकेला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तो सध्या रुग्णालयात उपचार घेत आहे. या प्रकरणी योगेश चाळके यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पुर्ववैमनस्यातून न्यायालयाच्या आवारात साक्षीसाठी आले असताना कोयतीने वार केल्याप्रकरणी पोलिसांनी संशयित स्वरुप राऊत यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास शहर पोलिस अमंलदार करत आहेत.