अंगारकी दिवशी गणपतीपुळे 40 हजार पर्यटकांची हजेरी

गणपतीपुळे:- अंगारकी चतुर्थीनिमित्त दिवसभरात सुमारे 40 हजारहून अधिक भाविकांनी श्रींचे दर्शन घेतले. पाऊस असतानाही भाविकांची प्रचंड गर्दी होती. सर्वाधिक गर्दी कोल्हापूर, सांगली, साताऱ्यासह बेळगाव मधील लोकांची होती.

अंगारकी चतुर्थीनिमित्त संस्थांनने श्रीदेव गणपतीपुळेच्यावतीने पहाटे साडेतीन वाजता स्वयंभू गणेश मंदिर खुले केले. गणपती मंदिराचे मुख्य पुजारी अमित घनवटकर यांच्या हस्ते श्रींची महापूजा झाली. दर्शनासाठी मंदिर परिसरात दर्शनाची व्यवस्था देवस्थान समितीतर्फे करण्यात आली होती. खास पत्र्याची शेड उभारण्यात आल्यामुळे आज दिवसभर त्याचा फायदा झाला. गणपतीपुळे ग्रामपंचायतीने संपूर्ण मंदिर परिसरात विद्युत व्यवस्था सुरळीत ठेवली. पार्किंगची व्यवस्था येथील स्मशानभूमी ठिकाणच्या सागर दर्शन पार्किंग मध्ये करण्यात आली होती. एकूणच मंदीर परिसर व समुद्र चौपाटीवर कुठलाही अनुचित प्रकार व दुर्घटना घडू नये,याकरिता गणपतीपुळे ग्रामपंचायतीचे जीवरक्षक, देवस्थानचे सुरक्षारक्षक व पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. देवस्थान समितीकडून सायंकाळी साडेचार वाजता गणपती मंदिराच्या प्रदक्षिणा मार्गे स्वयंभू “श्रीं”ची ढोलताशांच्या गजरात वाजत गाजत, फटाक्यांच्या आतषबाजीत व मंगलमूर्ती मोरयाचा जयघोष करीत भव्य पालखी मिरवणूक काढण्यात आली. या पालखी मिरवणुकीत देवस्थानचे सरपंच डॉक्टर श्रीराम केळकर, व सर्व पंच देवस्थानचे मुख्य पुजारी अमित घनवटकर, देवस्थानचे कर्मचारी, स्थानिक ग्रामस्थ व भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या अंगारकी चतुर्थी उत्सवानिमित्त रात्री चंद्रोदयानंतर अकरा वाजता स्वयंभू श्रींचे चे मंदिर बंद करण्यात आले. गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पाच अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली नियुक्ती केली होती.