सफरचंद विक्री व्यवहारातून घडला होता प्रकार
रत्नागिरी:- फळ व्यापाऱ्याशी सफरचंद विक्री व्यवहारातून झालेले देणे-घेणे आणि अपहरण, मारहाणीच्या गुन्ह्याप्रकरणी निपाणी आणि चिकोडीच्या दोन व्यापाऱ्याना रत्नागिरी येथील सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला.
इमरान रऊफ बागवान (रा. निपाणी, बेळगाव) याने रत्नागिरीच्या सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. बागवान याचा फळ विक्रीचा व्यवसाय आहे. फिर्यादीचे आणि अर्जदाराचे फळ विक्रीसंदर्भातून काही व्यवहार झाले होते. 60 लाख रुपयांची रक्कम थकित असल्याचे या व्यवहारात अर्जदार यांचे म्हणणे होते. 15 मे 2024 ला तक्रारदार यांनी रत्नागिरी पोलिसांकडे तक्रार केली की, बागवान याने आपल्या ताब्यात रत्नागिरीच्या ग्राहकाला ठेवले आहे. बागवान याचा अर्ज सत्र न्यायाधीश एस. एस. गोसावी यांच्यासमोर सुनावणीस आला. न्यायाधीशांनी अर्जदार व सरकार पक्ष यांची बाजू ऐकून घेतली आणि अर्जदाराला 25 हजार रुपयांचा अटकपूर्व जामीन सशर्तरितीने मंजूर केला. यापूर्वी तक्रारदार व आरोपी यांच्यामध्ये निगोशिएबल इस्ट्रूमेंट ऍक्टप्रमाणे नोटीस देण्याचा प्रकार झाला होता. या शिवाय अन्य परिस्थितीजन्य मुद्दे लक्षात घेवून न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला. याशिवाय सदाशिव शेखर बेन्नाळी (रा. चिकोडी, बेळगाव) यानेही अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. त्यालाही सत्र न्यायालयाने 25 हजार रुपयांचा जामीन मंजूर केला. रत्नागिरीतील ग्राहकाला फळ व्यापाराच्या संदर्भात पकडून नेले असा आरोप ठेवण्यात आला होता.