रत्नागिरी:- रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात आपण प्रामाणिकपणे काम केले. प्रत्येक शिवसैनिकांचे योगदान यात नक्कीच आहे. याठिकाणी मताधिक्क्य घेण्यात अपयश आले असले तरी आगामी विधानसभा व अन्य निवडणुकांमध्ये निश्चित यश मिळेल असा विश्वास रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला. निलेश राणे व नितेश राणे यांचे गैरसमज लवकरच दूर होतील, माझ्यासाठी हा विषय संपला असून यापुढे आपण या विषयात बोलणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
रत्नागिरी विधानसभा मतदार संघात महायुतीचे उमेदवार नारायण राणे पिछाडीवर राहिल्याने नितेश राणे व निलेश राणे यांनी ना सामंत यांना टार्गेट केले होते. यानंतर शुक्रवारी रत्नागिरीत आलेल्या ना. सामंत यांनी पत्रकारांशी संवाद साधला. रत्नागिरीतील मताधिक्क्याबाबत आपण भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, रत्नागिरीची जबाबदारी असणारे बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्याशी आपण चर्चा केली असून, त्यांच्या समोर मत मांडले आहे. या मतदार संघात नारायण राणे हे पन्नास हजार मतांनी विजयी झाले आहेत. रत्नागिरीसह सिंधुदुर्गतील पदाधिकारी व शिवसैनिकांनीही त्यांचे प्रामाणिक काम केले आहे.
काही व्यक्ती गैरसमाजाचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. निलेशजी व नितेशजी यांचे गैरसमज लवकरच दूर होतील, येत्या काही दिवसांमध्ये पदवीधर निवडणूक असल्याने त्याचे परिणाम आपण या निवडणुकीवर होऊ देणार नाही असेही ना. सामंत यांनी सांगितले. हे महायुतीच्या घरातील भांडण आहे. ते पुढे न्यायचे की नाही न्यायचे याच्यावर विचार करायला आम्ही प्रगल्भ आहोत. त्यामुळे या विषय खिलाडूवृत्तीने बघून त्यातून मार्ग काढू असे ते म्हणाले. खा. राणे साहेब यांना आपण स्वत: भेटणार आहोत. त्यांच्यासोबत आपण वाड्यावस्तांवर फिरलो आहे. ही कटूता फारकाळ राहील असे वाटत नाही. त्यामुळे भविष्यात महायुतीचा उमेदवार निवडून आणण्यासाठीच आणखी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. माझ्यासाठी हा विषया संपला आहे. यापुढे आपण या विषयात बोलणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले.
माझा मतदार संघ मागण्याचा त्यांना अधिकार आहे. लोकशाहीने त्यांना तो दिला आहे. या मतदार संघात मुस्लीम मतांचा मोठा फटका बसला आहे. परंतु मुस्लिम समाजात महाविकास आघाडीने पसरवलेले गैरसमज दूर करणे आवश्यक आहेत. महायुतीला याचा फटका पुढील निवडणुकांमध्ये बसणार नाही याचीही दक्षता घेतली पाहिजे.