देवघर येथे आढळलेल्या तरुणाचा संशयास्पद मृत्यू

गुहागर:- गुहागर तालुक्यातील देवघर येथे नदीकिनारी आढळून आलेल्या मृतदेहाची ओळख पटली असून तो खेड तालुक्यातील आंबडस गवळवाडी येथील असल्याचे त्याच्या नातेवाईकांनी पोलिसांना सांगितले. गुहागर पोलीस ठाण्यात तशी नोंदही झाली असून या तरुणाच्या मृत्यूमागे घातपाताचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.

आंबडस गवळवाडी येथील गणेश शिवराम माने (४५) हा तरुण १७ एप्रिल २०२४ रोजी आपली सासरवाडी चिपळूण तालुक्यातील मार्गतांम्हाने गोपाळवाडी येथे माहेरी आलेल्या पत्नीला व मुलांना भेटण्यासाठी आला होता. यानंतर तो आंबडस या त्याच्या गावी परतला नसल्याने नातेवाईकांनी शोधाशोध केली. यानंतर तशी बेपत्ता नोंद २४ एप्रिल रोजी खेड पोलीस ठाण्यात त्याच्या नातेवाईकांनी केली होती. यानंतर ३१ मे रोजी चिपळूण पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला होता.

दरम्यान, गुहागर तालुक्यातील देवघर येथे एका नदीकिनारी गणेश माने याचा मृतदेह १ जून रोजी आढळून आल्याने एकच खळबळ उडाली होती. त्याच्या नातेवाईकांनी येथे प्रत्यक्ष येऊन पाहणी केली असता, मृतदेहाची ओळख पटली. मृतदेहाचा १५ दिवसांचा कालावधी लोटल्याने तो रत्नागिरी येथे शवविच्छेदनासाठी नेण्यात आला. पुढील तपास गुहागर पोलिस करत आहेत. माने याच्या पश्चात एक मुलगा, दोन मुली, आई, भाऊ आहे.