रत्नागिरीतील गावडे आंबेरे गावावर शोककळा
रत्नागिरी:- वेंगुर्ले येथे बोट पलटी होऊन झालेल्या दुर्घटनेतील चारही बेपत्ता खलाशांचे मृतदेह सापडले आहेत. शुक्रवारी दोन तर शनिवारी दोन मृतदेह सापडले आहेत. बोट बुडून मृत झालेल्या चार पैकी तीन मध्यप्रदेश तर एक जण रत्नागिरीतील गावडेआंबेरे मधील खलाशी होते.आझाद मुनीलाल कोल, चांद गुलाल महमद, शिवराम कोल हे तिघे मध्य प्रदेश मधील तर महादेव शंकर आंबेरकर हा मूळचा रत्नागिरीचा होता. हे सर्व खलाशी वेंगुर्ले येथे मासेमारी बोटीवर कामाला होते.
वेंगुर्ले बंदरात बुधवारी दि. २३ मे रात्री मच्छिमार बोटींना लागणार बर्फ घेऊन जात असताना बोट उलटली. या बोटीमध्ये एकूण सात खलाशी होते. बोट पलटी झाल्यानंतर तीन जणांनी पोहून किनारा गाठला. तर चार जण बेपत्ता होते, त्यातील चौघांचे मृतदेह शुक्रवार, शनिवारी सापडले. वेंगुर्ला बंदरातून रात्री मच्छिमारांना लागणारा बर्फाची वाहतूक सुरू असताना ही दुर्घटना घडला. रात्री ढगांचा गडगडाट जोरदार वादळी वारे अशी परिस्थिती असल्यामुळे ही बोट भरकटल्याने हा प्रकार घडला.
राज्यात आठवड्यात १० दुर्घटना
महाराष्ट्रात या आठवड्यात १० दुर्घटना घडल्या असून यात ४० निष्पापांना आपला जीव गमवावा लागला आहे. यामध्ये बोट पलटून मृत्यू झाल्याच्या तीन घटना घडल्या आहेत. सिंधुदुर्गात चौघांचा, उजनीत सहा आणि प्रवरा नदीत एसडीआरएफची बोट उलटल्याने सहा जणांचा मृत्यू झाला. बोट पलटून तब्बल १६ जणांचाा मृत्यू झाला आहे.