जिल्ह्यात किसान सन्मानचे ११ हजार शेतकरी लाभापासून वंचित

रत्नागिरी:- पंतप्रधान किसान सन्मान योजनेद्वारे पात्र शेतकऱ्यांना वर्षभरात तीन हप्त्यांमध्ये प्रत्येकी दोन हजार रुपयांप्रमाणे सहा हजार रुपयांचा लाभ देण्यात येतो. आतापर्यंत दोन हजारांचे १६ हप्ते शेतकऱ्यांना मिळाले आहेत; मात्र, ई-केवायसी नसल्यामुळे जिल्ह्यातील २ हजार ४४४ शेतकरी तर आधार सिडींग नसल्यामुळे ९ हजार १०२ शेतकरी लाभापासून वंचित राहिले आहेत. अनेक ज्येष्ठ नागरिकांच्या बोटांचे ठसे जुळत नाहीत तर काही शेतकरी मृत झाल्याची अद्याप वारसांनी नोंद केलेली नाही. शिवाय आधार सिडींग व ई-केवायसी न केल्यामुळेही ‘पीएम’ किसान सन्मान निधीपासून शेतकरी वंचित राहिले आहेत.

पीएम किसानसाठी ई-केवायसी व आधार संलग्नीकरण होणे आवश्यक आहे. एकूण ११ हजार ५५६ शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळालेला नाही. जिल्ह्यात ९८ टक्के ई-केवायसी काम पूर्ण झाले आहे. १ लाख ६१ हजार ६३५ शेतकरी पंतप्रधान किसान सन्मान निधीचे लाभार्थी आहेत. त्यापैकी १ लाख ५९ हजार १९१ शेतकऱ्यांचे ई-केवायसी पूर्ण झाले आहे. अद्याप २ हजार ४४४ शेतकऱ्यांचे ई-केवायसी प्रलंबित आहे. त्यामुळे ई-केवायसीचे अद्याप दोन टक्के काम अपूर्ण आहे तसेच जिल्ह्यातील लाभार्थी शेतकऱ्यांपैकी एकूण १ लाख ५२ हजार ५३९ शेतकऱ्यांचे आधार संलग्नीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. अद्याप ९ हजार १०२ शेतकऱ्यांनी आधार संलग्नीकरण केलेले नाही. त्यामुळे या शेतकऱ्यांना किसान सन्मान निधी योजनेचा लाभ मिळालेला नाही. जिल्ह्यातील शेतकरी किसान सन्मान निधी योजनेपासून वंचित राहू नयेत यासाठी ई-केवायसी मोहीम ग्रामपंचायत स्तरावर राबवण्यात आली होती तसेच ई-केवायसी पूर्ण करून घेण्यासाठी नोडल अधिकाऱ्याची नियुक्ती केली होती.