जिल्ह्यातील दहा हजार मुले करणार शिक्षणाचा श्री गणेशा

रत्नागिरी:- जिल्ह्यात यंदा तब्बल 10 हजार मुले पहिल्यांदाच शाळेची पायरी चढणार आहेत. त्यांचा शैक्षणिक श्रीगणेशा होणार आहे. या पार्श्वभूमीवर काही वर्षांपासून जिल्हा परिषदेच्या शाळांमधील वाढती गुणवत्ता, वाढत्या भौतिक सुविधा पाहता पालकांचेही पाय पुन्हा मराठी शाळांकडे वळले आहेत. त्यामुळेच या वर्षी आतापर्यंत तब्बल 10 हजार 571 मुलांचा गावच्या जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये प्रवेश होणार आहे.

गेल्या काही दिवसांपासून खासगी इंग्रजी शाळांशी स्पर्धा करताना जिल्हा परिषदेच्या शाळांनीही भौतिक सुविधा, शैक्षणिक गुणवत्तेत कात टाकली आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी किर्तीकिरण पुजार यांनी स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी विद्यार्थ्यांना मोफत पुस्तके, तज्ज्ञ शिक्षकांचे मार्गदर्शन, सराव चाचण्या घेण्याबाबत मार्गदर्शन केले.
शिक्षणाधिकारी बी.एम.कासार यांनी हे ‘मिशन’ म्हणून राबविले. त्याचबरोबर चार वर्षांपूर्वी गुणवत्ता कक्षाची स्थापना करण्यात आली होती. यावेळी विविध उपक्रम राबवण्यात आले. परिणामी शिष्यवृत्ती परीक्षा, नवोदय विद्यालय परीक्षेतही झेडपीची विद्यार्थी चमकताना दिसत आहेत.

गुणवत्तेबरोबरच मोफत गणवेश, मोफत पाठ्यपुस्तकेही दिली जात असल्याने पालकांचाही ओढा पुन्हा एकदा झेडपी शाळांकडे दिसत आहे. नावीण्यपूर्ण योजनांतून शाळा डिजीटल बनविल्याने सुविधांमध्ये भर पडली आहे. त्यामुळेच आज झेडपीच्या शाळेतही प्रवेशासाठी पालक मोठ्या प्रमाणात इच्छुक दिसत आहेत. आजमितीला दाखलपात्र 12 हजार विद्यार्थ्यांपैकी तब्बल 10 हजार 571 विद्यार्थ्यांचे झेडपी शाळेत प्रवेश झाल्याने हे झेडपी प्रशासनाचे आणि शिक्षकांचेही मोठे यश समजले जात आहे. प्रवेशाचा हा आकडा आणखी वाढण्याची आशा शिक्षण विभागातून व्यक्त होत आहे.
निपूण भारतच्या प्रभावी अंमलबजावणीकरिता इयत्ता पहिलीच्या दाखलपात्र बालकांसाठी मे महिन्यात पहिलं पाऊल हा उपक्रम राबवण्यात आला.
शाळा पूर्व तयारी अभियानाचा प्राथमिक स्तरावरील संपादणूक पातळीवर खूप चांगला परिणाम दिसून आला आहे.

पहिल्या दिवशी पुस्तक दिन साजरा करून मोफत पाठ्यपुस्तकांचे वितरण केले जाणार आहे. शाळा प्रवेश दिंडीचे आयोजन, शिक्षणाची पालखी मिरवणूक, झांज लेझीम पथक, दाखलपात्र मुलांची वाजतगाजत शाळेत आगमन, पहिल्या दिवशी गोड खाऊचे वाटप होणार आहे.