रत्नागिरी:- रत्नागिरीत प्रथमच ‘भंडारी प्रीमियर लीग’ क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. जयगड, कचरे येथील साईबाबा क्रीडांगणावर होणाऱ्या भव्य क्रिकेट स्पर्धेचा शुभारंभ १६ मे रोजी करण्यात येणार आहे. रत्नागिरी आणि गुहागर तालुक्यातील नामांकित १२ संघ या स्पर्धेत सहभागी होणार आहेत.
ग्रामीण भागातील भंडारी समाज बांधवांच्या संकल्पनेतून या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. रत्नागिरी आणि गुहागर तालुक्यातील भंडारी समाजातील खेळाडूंसाठी प्रथमच या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. १६ मे रोजी या भव्यदिव्य क्रिकेट स्पर्धेचा शुभारंभ रत्नागिरी तालुका भंडारी समाज अध्यक्ष राजीव किर यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. यावेळी नांदिवडे सरपंच आर्या गडदे, मालगुंड सरपंच श्वेता खेऊर, वरवडे सरपंच विराग पारकर, कासारवेली सरपंच वेदिका बोरकर, काळबादेवी सरपंच तृप्ती पाटील, गुहागर तालुक्यातील भंडारी समाजाचे सामाजिक कार्यकर्ते निलेश सुर्वे आदी उपस्थित राहणार आहेत.
पहिल्यांदाच भरवण्यात येणाऱ्या भंडारी प्रीमियर लीगसाठी लाखोंची बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. स्पर्धेत विजेत्या संघाला ५१ हजार रोख व आकर्षक चषक देण्यात येणार आहे. उपविजेत्या संघाला ३५ हजार रोख व चषक, तृतीय क्रमांकाचे पारितोषिक २५ हजार रोख व चषक, चौथ्या क्रमांकाचे पारितोषिक ११ हजार रोख व चषक देऊन गौरवण्यात येणार आहे. याशिवाय मालिकावीर, उत्कृष्ठ फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, सर्वाधिक षटकार, सर्वाधिक चौकार मारणाऱ्या खेळाडूला देखील गौरवण्यात येणार आहे. या स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी निखिल बोरकर 9422750907 आणि पंकज नार्वेकर 8668699844 या क्रमांकावर संपर्क करावा असे आवाहन करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी अधिकाधिक भंडारी समाज बांधवांनी उपस्थित राहून सहकार्य करावे असे आवाहन आयोजकांमार्फत करण्यात आले आहे.