महामार्गावर अपघातात बालिकेचा मृत्यू

खेड-नातूनगरनजीक घटना : पिकअप व्हॅनची खासगी बसला धडक

खेड:- मुंबई-गोवा महामार्गावरील नातूनगरनजीक बुधवारी सकाळी ७.४५ वाजण्याच्या सुमारास पंक्चर काढण्यासाठी थांबलेल्या खासगी आराम बसला महिंद्रा पिकअप व्हॅनने दिलेल्या धडकेने बसच्या खिडकीजवळ बसलेल्या आदिती ब्रिजेश डिंगणकर (रा. जामसुद-गुहागर) या सात वर्षीय बालिकेचा जागीच मृत्यू झाला. अन्य एक प्रवासी जखमी झाला.

विनोद सखाराम काटकर (३६ रा. परचुरी- गुहागर) असे जखमी प्रवाशाचे नाव आहे. त्याला उपचारासाठी तातडीने कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. चालक दीपक किशोर घोसाळकर (रा. बोरज-खेड) हा आपल्या ताब्यातील खासगी आराम बसमधून (एम.एच.- ४८/बी.एम.-१३४०) प्रवाशांना घेऊन विरार येथून गुहागर येथे जात होता. नातूनगर येथे बस आली असता बसचा टायर पंक्चर झाल्याने पंक्चर काढण्यासाठी नातूनगर फाट्यासमोरील पंक्चरच्या दुकानासमोर रस्त्याच्या डाव्या बाजूला बस उभी केली होती.

याचवेळी विवेक धोंडू देसाई (५६ रा. मालाड- मुंबई) हा आपल्या ताब्यातील महिंद्रा पिकअप व्हॅन (एमएच-०४/केएफ-८५४७) घेऊन येत असताना पाठीमागून बसला धडक दिली. या अपघातात बसच्या उजव्या बाजूच्या मागून दोन नंबरच्या खिडकीजवळ बसलेल्या आदिती ब्रिजेश डिंगणकर या सातवर्षीय बालिकेच्या महामार्गावर अपघातात बालिकेचा मृत्यू डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने ती जागीच गतप्राण झाली. तर बसमधील अन्य प्रवासी विनोद सखाराम काटकर यांना किरकोळ दुखापत झाली. अपघाताचे वृत्त समजताच कशेडी येथील वाहतूक पोलीस मदत केंद्राचे पोलीस उपनिरीक्षक प्रवीण धडे व सहकारी तसेच स्थानिक पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचून मदतकार्य केले. बालिकेच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या महिंद्रा व्हॅन चालकावर पिकअप सायंकाळी उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. अपघातग्रस्त महिंद्रा पिकअप व्हॅनही पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. मुंबई-गोवा महामार्गावर अपघातांचे सत्र सुरुच असल्याने पोलिसांची डोकेदुखी कायम आहे.