रत्नागिरी:- लांजा तालुक्यातील कुरचुंबे येथे मधमाशी चावल्याने वृद्ध जखमी झाला. अधिक उपचारासाठी त्याला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्रकाश शिवराम पाटोळे (वय ६५, रा. कुरचुंबे-जाधववाडी, ता. लांजा) असे जखमी वृद्धाचे नाव आहे. ही घटना सोमवारी (ता. २९) सकाळी नऊच्या सुमारास कुरचुंबे गावातील श्री गांगेश्वर मंदिराजवळ घडली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार कुरचुंबे गावातील श्री गांगेश्वर मंदिराचा आठवा वर्धापनदिन होता. त्यासाठी जाधववाडीतून या कार्यक्रमाला जखमी प्रकाश पाटोळे व चंद्रकांत जाधव हे दोघे गेले होते. वर्धापन दिनानिमित्त हे दोघे महाप्रसाद जेवण करत असताना त्यांना एका झाडाखाली चूल मांडली होती. त्या झाडावर मध माशांचे पोळे होते. हे या मंडळींच्या लक्षात आले नाही. जेवण करण्यासाठी चुल पेटविताना झालेल्या धुरांड्याने मध-माशा फिरु लागल्या व प्रकाश पाटोळे यांना मोठ्या प्रमाणात चावल्या त्यात ते जखमी झाले. उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र शिपोशी येथे दाखल करण्यात आले होते. अधिक उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी रुग्णालयाच्या पोलिस चौकीत नोंद करण्यात आली आहे.