रत्नागिरी:- कबुतरांना दाणे टाकण्यासाठी बिल्डिंगच्या टेरेसची चावी देत नसल्याच्या रागातून अशोक महादेव वाडेकर (60) या वॅाचमनचा लाकडी दांडका आणि दगडाने ठेचून खून करणार्या संशयिताच्या शहर पोलिसांनी काही तासातच मुसक्या आवळल्या. खूनाची ही घटना शनिवार 28 एप्रिल रोजी सायंकाळी 7.30 वा.सुमारास जेल रोड ते गवळीवाडा जाणार्या रस्त्यावरील रेगे कंपाउंडमध्ये उघडकीस आली होती.

वेदांत चंद्रकांत आखाडे (21,रा.गणेश कृपा, जेलरोड, रत्नागिरी) असे अटक करण्यात आलेल्या संशयित तरुणाचे नाव आहे. वेदांत आखाडेचा यापूर्वी तीन ते चार वेळा अशोक वाडेकर या वॉचमनशी तो रहात असलेल्या गेणश कृपा बिल्डिंगच्या टेरेसची चावी न देण्याच्या कारणावरुन वाद झालेला होता. वेदांत बिल्डिंगच्या टेरेसवर कबुतरांना दाणे टाकायचा परंतू कबुतरे त्याठिकाणी घाण करत असल्यामुळे सोसायटीने त्याला चावी न देण्याबाबत वॉचमन अशोक वाडेकर यांना सांगितले होेते. त्यामुळे वाडेकर वेदांतला टेरेसची चावी देत नव्हते. याचा राग मनात धरुन त्याने शनिवारी सायंकाळी अशोक वाडेकर यांच्यावर पाळत ठेवली होती. शनिवारी सायंकाळी अशोक वाडेकर रेगे कंपाउंडमधून जाणार्या पायवाटेने घरी जात असताना त्यांच्या पाठीमागून जात प्रथम लाकडी दांडक्याने आणि त्यानंतर दगडाने डोक ठेचून वेदांतने त्यांचा निर्घूण पध्दतीने खून केला.
खूनाची माहिती मिळताच शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेहाचा पंचनामा करुन तपास सुरु केला. पोलिसांनी गेणश कृपा बिल्डिंगचे सीसीटिव्ही फूटेज तपासले असता त्यांना त्या बिल्डिंगमध्येच राहणारा वेदांत बिल्डिंगमध्ये शिरताना दिसून आला. पोलिसांनी आपला खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्याची कबूली दिली. दरम्यान,रविवारी वेदांतला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला 4 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.