पंतपधान नरेंद्र मोदी ही देशाची गरज: ना. नारायण राणे

रत्नागिरी:- पंतपधान नरेंद्र मोदी ही देशाची गरज आहे. मोदी यांनी गुणात्मक विकास देशाचा केला. म्हणून ‘अब की बार मोदीच’. मलाही कोकणासाठी काही करायचे आहे. या लोकसभा निवडणूकीसाठी मला सगळ्यांचा पाठींबा आहे. निवडणुका येतील, जातील. पण रत्नागिरी-सिंधुदुर्ग हे जिल्हे आर्थिक प्रगत असावेत, असे आमचे प्रयत्न आहेत. मी खासदार झाल्यावर रत्नागिरीचा एकही प्रश्न शिल्लक ठेवणार नसल्याचे महायुतीचे उमेदवार तथा केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी सांगितले.

रत्नागिरीतील स्वयंवर मंगल कार्यालयात बुधवारी महायुतीचा प्रतिष्ठित मान्यवरांचा संवाद कार्यकम पार पडला. या कार्यक्रमात केंद्रीयमंत्री नारायण राणे हे बोलत होते. त्यावेळी व्यासपीठावर भाजपा नेते तथा राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे, सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण, भाजपा नेते बाळ माने, जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, शिवसेनेचे किरण उर्फ भैय्या सामंत, जिल्हाध्यक्ष राहुल पंडित आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.

संवाद कार्यकमात केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी पंतपधान नरेंद्र मोदींच्या कार्याचे उपस्थितांसमोर गुणगान व्यक्त केले. गेल्या या 10 वर्षात मोदींनी भारताला अर्थव्यवस्थेत पाचव्या क्रमांकावर आणला. पंतप्रधानांवर भ्रष्टाचाराचे आरोप कोणी करु शकले नाही. कोणत्याही विषयात पंतप्रधान कमी पडत नाहीत. प्रत्येक विषयावर त्यांची कमांड, गरिबांविषयी आस्था आहे. दहा वर्षात 54 योजना जाहीर केल्या. कोरोनात नरेंद्र मोदींनी 80 कोटी जनतेला मोफत धान्य सुरु केले. आजही सुरु आहे. 11 कोटी 72 लाख शौचालये दिली. 8 कोटी लोकांना नळाने पाणीपुरवठा दिला. पावणे चार कोटी लोकांना घरे दिली. आयुष्यमान योजना सुरु केली. 90 टक्के सबसिडी योजना सुरु केल्या. त्यामुळे मी सांगू इच्छितो, भाजपच्या पाठीशी उभे रहा. मी खासदार झाल्यावर रत्नागिरीचा एकही प्रश्न शिल्लक राहणार नाही, अशी ग्वाही नारायण राणे यांनी दिली.

अडीच वर्ष मी मंत्रीमंडळात आहे. त्यामुळे मला लोकांसाठी विकासकामे करण्याची संधी प्राप्त झाली. माझ्या खात्यांतर्गत 8 कोटी उद्योग आहेत. मी खासदार झाल्यावर रत्नागिरीचा एकही प्रश्न शिल्लक ठेवणार नाही, असा विश्वास नामदार नारायण राणे यांनी यावेळी व्यक्त केला. मी तेरा वर्ष नोकरी केली. व्यवसायापासून पण थांबलो नाही. मला कोकणासाठी काही करायचे आहे. माझ्या कामाचा वेग असेलच पण मतदान पण त्याच वेगाने झाले पाहिजे’, असेही राणे म्हणाले.

रत्नागिरीच्या विकासात्मक गोष्टीवर राणे म्हणाले की, आज रत्नागिरी हॉस्पीटल्स चांगले का होवू शकत नाही? असा सवाल त्यांनी केला. एवढे विचारवंत एकत्र येतात, पण पुढे काय? असे सांगत यापुढे किमान 6 महिन्यांनी मिटींग घेत प्रश्न सोडवू. तसेच डिसेंबरपर्यंत रत्नागिरीचा महामार्ग पूर्ण होईल असेही राणे यांनी ग्वाही दिली आहे. कोकणात फार हुशार माणसे आहेत. मी थांबत होतो पण मला पक्षस्तरावरून सांगितले की, तुमची सुटका नाही. त्यामुळे माझ्याएवढा नशीबवान राजकारणात कोणी नसल्याचे आर्वजून सांगितले. या सभेला मोठ्या संख्येने महायुतीतील प्रतिष्ठीत कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

आज भारत देश एक नंबरचा होण्यास सुरूवात झालीय. पूर्वी दुसऱ्यांवर अवलंबून रहावे लागत होते. पण आता देशाला इतरांवर अवलंबून रहावं लागत नाही. आपल्या देशातून जास्तीत जास्त निर्यात होतेय. देशाचे 40 हजार कोटी वाचायला सुरूवात झाली. त्याचा फायदा थेट शेतकऱ्यांना होऊ लागला आहे. दुरदृष्टी, व्हीजन कसे असावे, देश महासत्तेकडे कसा जायला हवा, आंतरराष्ट्रीय पॉलिसीत आपणाला कुठे झुकतं माप असायला हवे, या सर्व भूमिका निभवाव्या लागतात. आज जगात देशाची सारी विश्वासार्हता निर्माण केली. संपूर्ण जगाने पंतपधान मोदींचे नेतृत्व स्वीकारले आहे. या साऱ्या उत्सवाकडे सकारात्मक नजरेने पहा, गांभीर्य लक्षात घ्या. त्यामुळे चुकीच्या व्यक्तीच्या हातात देश गेला तर काय होऊ शकेल याचा विचार करा. देशाचे होणारे नुकसान तुम्हाला आम्हाला वाचवणे महत्वाचे आहे. त्यासाठी पंतपधान मोदींना करण्यासाठी महायुतीचे उमेदवार नारायण राणेंच्या पाठीशी खंबीर रहा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातील मतदारांना आपली भूमिका स्पष्ट सांगा असे आवाहन सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांनी यावेळी केले.