उन्हाळ्यात अंगणवाड्याची वेळ बदलण्याचा निर्णय लांबणीवर

रत्नागिरी:- गेल्या काही दिवसांत उन्हाचा कडाका वाढू लागल्यामु जिल्हा परिषद शाळांच्या वेळा बदलून त्या सकाळच्या सत्रात भरवल्या जात आहेत; मात्र अंगणवाड्यांच्या वेळांमध्ये बदल करण्यासाठी प्रशासनाला विलंब झाला. रत्नागिरी तालुक्यातील अंगणवाड्या सकाळी ८.३० ते १०.३० करा अशा सुचना महिला बाल कल्याणकडून देण्यात आल्या आहेत. मात्र याबाबत जिल्हापरिषदेकडून कोणतेही पत्र न आल्यामुळे तालुकास्तरावर संभ्रम होता.

अंगणवाड्यांमध्ये तीन वर्षांवरच्या आणि सहा वर्षांपर्यंतच्या वयोगटातील मुले असतात. जिल्हापरिषदेच्या शाळांमध्ये अर्थातच त्यापेक्षा वरच्या वयोगटातील मुले असतात. त्यांना उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून शाळांची वेळ बदलण्यात आली. मात्र त्या शाळांच्या वेळा बदलून पंधरा दिवस होऊन गेले तरीही अंगणवाड्यांच्या वेळेचा निर्णय लांबला होता. लहान मुलांच्या अंगणवाड्यांबाबतीत हा निर्णय घेण्यासाठी प्रशासनाकडून विलंब झाला.

सकाळी १० ते दुपारी एक या कालावधीत अंगणवाड्या भरवल्या जातात. सध्या वाढलेल्या तापमानामुळे या वेळेत अंगणवाडीत असताना मुलांना खूप उकाडा होतो आणि दुपारी एक वाजता भर उन्हातून त्यांना घरी जावे लागते. सर्व मुलांची घरे अंगणवाडीच्या जवळ असतील असे नाही. तसेच सर्वांच्या पालकांकडे गाड्या असतातच असेही नाही. त्यामुळे अनेक मुलांना दुपारी एक वाजता कडक उन्हातून चालत घरी जावे लागते. त्यामुळे अनेकांना सर्दी-तापासारखे आजारही होत होते. एकीकडे उष्माघातापासून बचाव करण्यासाठी काय काय करावे, याच्या सूचना देणाऱ्या पोस्ट्स सरकारी यंत्रणांकडून सोशल मीडियावर शेअर केल्या जात असताना अंगणवाड्यांच्या निर्णयाबाबत प्रशासनाकडून दुर्लक्ष झाले. जिल्हास्तरावरून आदेश न आल्यामुळे रत्नागिरी तालुक्यातील अंगणवाड्या सकाळी 8.30 ते 10.30 या कालावधीत भरवण्यात याव्यात अशा सुचना महिला व बाल कल्याण विभागाकडून देण्यात आले. त्याची अंमलबजावणी नुकतीच सुरू झाली आहे. त्यामुळे पालकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.