चिपळूणः– शिमगोत्सवासाठी तालुक्यातील दोणवली येथे दुचाकीवरुन जात असलेल्या पती-पत्नीचा गुहागर-विजापूर मार्गावरील केंढे येथे दुचाकी झाडावर आदळून झालेल्या अपघातात पत्नीचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास घडली. यात पतीदेखील गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी खासगी रुग्णालयात नेण्यात आले आहे.
गौरव लक्ष्मण मिरगल (28) असे जखमी झालेल्या पतीचे, तर अंकिता गौरव मिरगल (21) असे मृत्यू झालेल्या पत्नीचे नाव आहे.
तालुक्यातील दोणवली येथे शिमगोत्सवासाठी गौरव मिरगल, अंकिता मिरगल हे दोघे दुचाकीने पुण्याहून तालुक्यातील दोणवली येथे जात होते. असे असताना ते गुहागर-विजापूर मार्गावरुन पवास करतेवेळी ते केंढे रिगल कॉलेजपासून काही अंतरावर असलेल्या एका अवघड वळणावर आले असता त्याची दुचाकी एका झाडावर आदळून हा भीषण अपघात झाला. यात ते दोघे गंभीररित्या जखमी झाले.
याबाबतची माहिती परिसरातील नागरिकांना समजल्यानंतर त्यांनी याची कल्पना चिपळूण पोलिसांना दिली. त्यानुसार पोलीस घटनास्थळी दाखल झाले. यानंतर या जखमी पती- पत्नीला एका खासगी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र या अपघातात अंकिता या गंभीररित्या जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला.