रत्नागिरी रेल्वे स्थानकाचा कायापालट करण्यासाठी 14 कोटी

रत्नागिरी:-  कोकणाचं सौंदर्य वाढवण्यासाठी, कोकण विभागामध्ये पर्यटनास चालना देण्याकरिता विमानतळावरील वातावरणाप्रमाणे रेल्वे स्टेशनवर येणाऱया प्रत्येक प्रवाशाला तशा वातावरणाचा अनुभव आला पाहिजे. त्याअनुषंगाने या कोकणातील मुख्य रत्नागिरी रेल्वेस्थानकाचा 14 कोटीच्या निधीतून लवकरच कायापालट होणार आहे.

या कामाचे भूमिपूजन आणि कोनशिला अनावरण राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते शुकवारी सायंकाळी झाले. या नूतनीकरण होणाऱया रेल्वेस्थानकावर वाहनतळ, एसटी स्टँड, रिक्षा स्टँड वेगळ्या ठिकाणी असलं पाहिजे. आनंदमय आणि अल्हाददायक वातावरण प्रवाशांना देण्याचा प्रयत्न सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून केला जात आहे, अशी प्रतिक्रिया सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळून) रविंद्र चव्हाण यांनी यावेळी दिली.

रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग स्थानकांचा कायापालट होण्याची आज सुरुवात होणार आहे. पर्यटन विभागाच्या माध्यमातून चांगल्या योजना करण्याच काम सुरू आहे. मंत्री रविंद्र चव्हाण यांनी याबाबत प्रकल्प तयार केला. त्यासंदर्भात वेगाने कार्यवाही केली जात आहे. कोकणातल्या 12 रेल्वे स्थानकांच्या कामाचा शुभारंभ मागील आŸगस्टमध्ये आŸनलाईन पध्दतीने मुख्यमंत्री स्तरावरून करण्यात आला होता. कोकणाच्या दृष्टीने हा महत्वाचा उपक्रम आहे. प्रत्येकाची इच्छा असते आपलं स्टेशन स्वच्छ असल पाहिजे. प्रवाशांना उत्तम सुविधा मिळायला हव्यात. कोकणाला व तेथील पर्यटनाला त्याचा फायदा होणार आहे.

कोकण विभागामध्ये पर्यटनास चालना देण्याकरिता सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या पुढाकाराने व मार्गदर्शनाखाली रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिह्यातील कोकण रेल्वे स्थानकाच्या पोहोच मार्गाचे देखभाल दुरुस्ती व परिसरातील सुशोभिकरण करण्याचे नियोजन आखण्यात आले आहे. कोकण रेल्वे महामंडळ अंतर्गत पर्यटनदृष्ट्या महत्वाचे व सतत प्रवाशांची वर्दळ असणारे 12 रेल्वे स्थानकांचे काम पहिल्या टप्प्यात प्राधान्याने हाती घेण्यात आले आहे.

त्यात रत्नागिरी रेल्वे स्टेशनचा समावेश आहे. येथील रेल्वे स्टेशन इमारत परिसर विकास व सुधारणा करणे कामाचा पायाभरणी समारंभ सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्याहस्ते झाला. आणि रत्न-सिंधु योजनेचे विशेष निमंत्रित सदस्य तथा उद्योजक किरण उर्प भैय्या सामंत यांच्या हस्ते कोनशिला अनावरण करण्यात आले. यावेळी माजी आमदार बाळ माने, माजी आमदार प्रमोद जठार, बांधकामच्या अधीक्षक अभियंता छाया नाईक, कार्यकारी अभियंता अमोल ओटवणेकर, कोरेचे विभागीय व्यवस्थापक रविंद्र कांबळे, भाजप जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, शिवसेनेचे बिपीन बंदरकर, सुदेश मयेकर, विजय खेडेकर, पिंट्या साळवी, राजकुमार आदी उपस्थित होते.