प्रत्येक बुथ जिंकण्याचा कार्यकर्ता मेळाव्यात केले आवाहन
रत्नागिरी:- रत्नागिरी-सिंधुुदुर्ग लोकसभा मतदार संघ हा नेहमीच उजव्या विचारांना झुकते माप देणारा राहिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच विचार घेऊन पुढे जात आहे. गत निवडणुकीत याच विचारांना मतदारांनी प्राधान्य दिले होते. यावेळीही महायुती जिंकणार यात शंका नाही फक्त किती मतांनी जिंकणार याचा विचार आता मतदारांनी करायला हवा असे स्पष्ट मत राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी व्यक्त केले.
भारतीय जनता पार्टी दक्षिण रत्नागिरीच्या कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी लोकसभा मतदार संघाचे प्रभारी प्रमोद जठार, सहप्रभारी माजी आ. बाळ माने, दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, महिला जिल्हाध्यक्षा सौ. सुजाता साळवी, मा. आ. डॉ. विनय नातू, सतिश शेवडे, युवा जिल्हाध्यक्ष डॉ. ऋषिकेश केळकर, कामगार आघाडीचे लिलाधर भडकमकर, चिपळूण-संगमेश्वर विधानसभा प्रमुख प्रमोद अधटराव, माजी नगराध्यक्ष महेंद्र मयेकर यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
येथील स्वयंवर मंगल कार्यालयात आयोजित मेळाव्यात बोलताना रविंद्र चव्हाण म्हणाले की, कार्यकर्ते व पदाधिकार्यांनी प्रत्येक बुथ पर्यंत पोहचले तरच प्रत्येक मतदार संघातील प्रत्येक बुथ आपल्याला जिंकायचा आहे. त्यासाठी मतदारांपर्यंत पोहचले पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या दहा वर्षात काय केले हे मतदाराला सांगितले पाहिजे, ही निवडणूक देशहितासाठी आहे. ज्यांना देशहित कळत नाही त्यांना मतदारांनी दूर ठेवले पाहिजे. नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर अनेक नेत्यांनी अर्थसंकल्प कळला नाही असे म्हटले, ज्यांना हा अर्थसंकल्प कळला नाही त्यांना मतदान का करावे असे सुज्ञांनी विचार करायला हवा असेही त्यांनी सांगितले. युपीए सरकारमध्ये पंतप्रधान अर्थतज्ज्ञ होते. परंतु त्यांना जे करता आले नाही ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करुन दाखवले आहे. दहा वर्षापूर्वी जगभरात भारताची अर्थसत्ता 11व्या स्थानी होती आज ती पाचव्या स्थानावर असून पुढील वर्षात ती 3र्या स्थानापर्यंत घेऊन जायचे आहे. ही एक लढाई असल्याचे सांगितानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात जे काही केले ते लहान पिढीला कळत आहे. या पिढीला मतदानाचा अधिकार दिल्यास युपीएचे डिपॉझिट राहणार नाही, त्यामुळे जनता प्रगल्भ आहे असे त्यांनी सांगितले. फक्त राष्ट्रहित व पुढील पिढीचे हित लक्षात ठेवून जनतेने मतदान करावे असे आवाहनही त्यांनी केले. पंतप्रधानांनी देशासाठी घेतलेल्या निर्णयाची माहिती प्रत्येक नागरिकांपर्यंत गेल्यास बुथवर मतांचा पाऊस पडेल त्यामुळे दुसर्याची गरज पडणार नाही असे शेवटी त्यांनी सांगितले.
यावेळी त्यांच्या उपस्थितीमध्ये रत्नागिरी तालुक्यातील सोमेश्वर येथील साबीर पटेल, मेहसाब वस्ता यांच्यासह मोठ्या संख्येने मुस्लीम बांधवांनी माजी आमदार बाळ माने, तालुकाध्यक्ष दादा दळी यांच्या कामावर विश्वास ठेवत भाजपमध्ये प्रवेश केला. ना. रविंद्र चव्हाण यांनी त्यांचे स्वागत केले.
चिपळूण माजी पं.स. सभापतींचा भाजपमध्ये प्रवेश
चिपळूण पंचायत समितीच्या माजी सभापती सौ. स्नेहा मेस्त्री, माजी सरपंच खेर्डी सुनील मेस्त्री, अर्पणा दात्ये, रविंद्र फाळके, माजी सदस्य विनय दात्ये, सामाजिक कार्यकर्ते सतिश पंडीत, राजेंद्र शिंदे यांच्यासह चिपळूण, खेर्डी परिसरातील अनेक कार्यकर्त्यांनी माजी आमदार बाळ माने, चिपळूण अर्बनचे संचालक विनोद भुरण यांच्या पुढाकाराने भाजपामध्ये प्रवेश केला. सार्व. बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी त्यांचे स्वागत करीत, चिपळूण तालुक्यात पक्ष वाढवण्याचे आवाहन केले.