रत्नागिरी:- जिल्ह्यात लागू करण्यात आलेल्या नव्या लॉक डाऊनवर जिल्ह्यातून तीव्र प्रतिक्रिया उमटु लागल्यानंतर जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी नवा आदेश जारी करत उद्यापासून काही शिथिलता देण्याचा निर्णय घेतला. तालुक्यातील परिस्थिती पाहुन प्रांताधिकार्यांना निर्णय घेण्याचे अधिकार दिले तर रत्नागिरी बाजारपेठेत एक आड एक दिवस डाव्या उजव्या बाजूची दुकाने उघडली जाणार आहेत. तर रविवारी संपुर्ण बाजारपेठ बंद राहणार आहे.
नगरपालिका, नगरपंचायतीच्या हद्दीतील दुकाने उघडी ठेवण्यासाठी आराखडा मंजूरीबाबतचे अधिकार प्रांताधिकार्यांना दिले. नगरपंचायत, नगरपालिका व 5 हजार पेक्षा जास्त लोकसंख्येच्या गावाच्या हद्दीतील दुकाने उघडी ठेवण्याबाबत शासनाच्या मार्गदर्शक तत्वानुसार निर्णय घ्यायचा आहे. बाजारात गाड्यांची गर्दी होऊ नये, म्हणून बाजारपेठेपासून काही अंतरावर पार्किंगची व्यवस्था करवयाची आहे. नागरिकांनी योग्य सामाजिक अंतर राखले जाईल, याची काळजी घ्यावी. पोलिस, व्यापारी, आदींची बैठक घेऊन यावर निर्णय घ्यायचा आहे.
मात्र कोणत्याही बाजारपेठेच्या दुकानाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी होवून सामाजिक अंतराचे पालन न केल्यास तसेच कोरोनाचा प्रसार होईल, अशी स्थिती निर्माण झाल्यास उपविभागीय अधिकारी त्यांनी पोलिस विभाग व स्थानिक प्रशासनाच्या मदतीने संबंधित बाजारपेठ, दुकाने तत्काळ बंद करण्याबाबत कार्यावाही केली जाणार आहे.