रत्नागिरीतील मँगोपार्क निवेंडीत उभारणार; लवकरच भूसंपादन सुरु होणार

रत्नागिरी:- कोकणामध्ये आंबा व मासे मोठ्याप्रमाणात उत्पादन होत असल्याने त्यावर प्रक्रिया करणारे उद्योग व्हावेत यासाठी सातत्याने प्रयत्न सुरु आहेत. उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या प्रयत्नातून यासाठी सातत्याने प्रयत्न असून फिश व मँगो पार्क उभारणीकडे वाटचाल सुरु करण्यात आली आहे. रत्नागिरी तालुक्यातील निवेंडी येथे शंभर हेक्टरमध्ये मँगो पार्क उभारणीसाठी महसूल विभाग जागा ताब्यात घेणार असून, त्यासाठी लवकरच अधिसूचना जारी केली जाणार आहे.

रत्नागिरी विधानसभा मतदार संघाचा विकास व्हावा म्हणून गेली वीस वर्ष नवनवीन उपक्रम राबवत आहेत. शिंदे सरकारमध्ये उद्योगमंत्री व रत्नागिरीचे पालकमंत्री म्हणून जबाबदारी मिळाल्यानंतर त्यांनी आपल्या विकास कामांना अधिक गती दिली आहे. रत्नागिरी शहराचा पर्यटनदृष्ट्या विकास व्हावा म्हणून अनेक उपक्रम हाती घेतले आहेत. उच्च व तंत्रशिक्षणमंत्री असताना पुण्यानंतर रत्नागिरीची ओळख शिक्षणक्षेत्राशी व्हावी म्हणून इंजिनिअरींग कॉलेज, उपकेंद्र, फार्मसी, वैद्यकीय महाविद्यालये यासाठी प्रयत्न केले. हे सर्वच प्रयत्न यशस्वी ठरले.
पालकमंत्रीपद स्वीकारल्यानंतर त्यांनी मालगुंड येथे प्राणी संग्रहालय उभे रहावे यासाठी प्रयत्न केले असू, हे कामही येत्या काही दिवसात मार्गी लागणार आहे.
रत्नागिरीची ओळख आंबा, मासे व काजूसाठी आहे. मात्र याठिकाणी प्रक्रिया उद्योग अत्यंत अल्प आहेत. त्यामुळे आंबा व माशांवर प्रक्रिया करणारे उद्योग उभे रहावेत यासाठी ना. सामंत हे सातत्याने प्रयत्न करीत आहेत. रत्नागिरी तालुक्यात मँगो पार्क झाल्यास आंब्यावर प्रक्रिया करणारे अनेक उद्योग उभे राहातील यासाठी निवेंडी परिसरात हा उपक्रम हाती घेण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी परिसरातील ग्रामस्थांनाही ना. सामंत यांनी विश्वासात घेतले. एमआयडीसीच्या माध्यमातून ही जागा ताब्यात घेतली जाणार आहे.

रत्नागिरी तालुक्यातील निवेंडी येथील 91.23 हेक्टर तर तळेकरवाडीतील 7.56 हेक्टर अशी सुमारे 100 हेक्टर ताब्यात घेण्याची प्रक्रिया महसूल विभागाकडून लवकरच राबवली जाणार आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ ही जागा ताब्यात घेऊन मँगो पार्कच्या दृष्टीने प्रक्रिया उद्योगांना देणार असून, देशातील अनेक मोठे प्रक्रिया उद्योग या ठिकाणी येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे या भागात रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होणार आहेत.