प्रेमसंबंध तोडल्याच्या रागातून बहिणीच्या प्रियकराला माळनाका येथे बेदम मारहाण

रत्नागिरी:- माझे तुझ्या मानलेल्या बहिणीसोबत प्रेमसंबंध होते. परंतू सध्या आम्ही दोघे एकमेकांवर प्रेम करत नसून तसे मुलीच्या घरी सांग असे सांगितल्याच्या रागातून प्रियकराला तरुणीच्या मानलेल्या भावाने आणि त्याच्या तीन मित्रांनी मारहाण केली. ही घटना रविवार 25 फेब्रुवारी रोजी मध्यरात्री 12.30 वा. सुमारास माळनाका येथे घडली.

अक्षय गुरव (25, रा.कसोप,रत्नागिरी), सुरज पवार, सुमित सावंत देसाई आणि अन्य एक जण अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या चार जणांची नावे आहेत. त्यांच्या विरोधात आकाश तुषार शिंदे (24, रा. नारायणमळी, रत्नागिरी) याने शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, रविवारी मध्यरात्री माळनाका येथील मराठा हॉल समोर आकाश शिंदेने त्याच्या प्रेयसिचा मानलेला भाउ अक्षय गुरवला भेटायला बोलावले होते. त्यावेळी आकाशने अक्षयला माझे तुझ्या मानलेल्या बहिणीसोबत सध्या प्रेमसंबंध नसून ही बाब तू तिच्या घरी सांग असे सांगितले.

या गोष्टीचा राग आल्याने अक्षयने त्याचे मित्र सुरज पवार, सुमित देसाई आणि अन्य एकजण या तिघांना बोलावून घेतले. त्यानंतर अक्षय,सुरज आणि सुमित या तिघांनी आकाशला शिवीगाळ करुन मारहाण करायला सुरुवात केली. त्यावेळी आकाशचे मित्र ओंकार सावर्डेकर आणि साहिल यांनी तिथे यउेन आकाशची सोडवणूक करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा अक्षयच्या तिसर्‍या अज्ञात मित्राने हातातील स्टिलच्या कड्याने आकाशच्या डोक्यात मारहाण करुन त्याला दुखापत केली. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात संशयितांविरोधात भादंवि कायदा कलम 324,323,504,34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.