खेड:- केलेला फोन उचलत नाही तसेच अन्य बाहेर कुठे तरी प्रेमप्रकरण सुरू आहे याचा राग धरून एका प्रौढाने शेजारी राहणाऱ्या महिलेला मारहाण करून तिच्या गळ्यावर ब्लेडने वार करून जखमी केल्या प्रकरणी एकावर येथील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना १३ फेब्रुवारी रोजी रात्री १०.३० वाजताच्या सुमारास चिंचघर प्रभुवाडी येथे घडली . अरविंद कृष्णा गुहागरकर रा . चिंचघर प्रभुवाडी ता . खेड असे गुन्हा दाखल झालेल्या चे नाव आहे . तर यामध्ये फिर्यादी एक महिला असून फिर्यादी या त्यांचे राहते घरातील जेवणाची भांडी घासत असताना त्यांचे शेजारी राहणारा अरविंद कृष्णा गुहागरकर , याचेशी फोनव्दारे बोलत नाही , त्याचा फोन उचलत नाही याचा राग मनात धरुन तसेच फिर्यादी यांचे बाहेर कोणाजवळ तरी प्रेम प्रकरण सुरु आहे असा समज करुन घेऊन अरविंद कृष्णा गुहागरकर याने फिर्यादी यांच्या पाठीमागुन येऊन फिर्यादी यांना जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने फिर्यादी यांचे केस पकडुन तोंडावर हात ठेवुन , फिर्यादी यांना जमिनीवर पाडुन त्याचे हातातील ब्लेडने फिर्यादी यांचे गळ्यावर वार केले असल्याचे तक्रारी मध्ये नमूद करण्यात आले आहे.