रत्नागिरी:- उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहणार्या वार्यांचा मासेमारीमध्ये अडचणी आलेल्या आहेत. गिलनेटने मासेमारी करणार्यांनी नौका बंदरातच उभ्या करुन ठेवल्या आहेत तर ट्रॉलिंग, फिशिंगच्या नौकाही परिस्थिती पाहून समुद्रात जात आहेत.
यंदा हंगामाच्या सुरवातीला मच्छीमारांना बर्यापैकी मासळी मिळत होती. बांगडा मुबलक असला तरी पाहिजे तसा मासळीला दर मिळत नव्हता. अधुनमधून नैसर्गिक संकटांमुळे मच्छीमारीत खंड पडत होता. गेले दोन दिवस किनारपट्टी भागात गार वारे वाहू लागले आहेत. वेगवान वार्यामुळे समुद्रात मासेमारीकरिता गेलेल्या मच्छीमारांची तारांबळ उडाली. मासे पकडण्यासाठी टाकलेली जाळी ओढताना त्रास होत असून नौका कलंडण्याची भिती होती. त्यामुळे अनेक मच्छीमार माघारी परतले आहेत. काहींनी जवळच्या बंदरात व खाडीत सुरक्षिततेसाठी आधार घेतला आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार ही परिस्थिती अजून दोन दिवस राहणार आहे. ट्रॉलिंगवालेही धोका पत्करुन समुद्रात जात आहेत; पण नौका स्थिर राहत नसल्यामुळे जाळी टाकता येत नाही. या कालावधीत मासेही मिळत नसल्याने मच्छीमारांची पंचाईत झाली आहे. गिलनेटला पाच ते दहा किलो बांगडा मिळत होता. वार्यामुळे समुद्र खवळला असून मासळी खोल समुद्राकडे गेल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. बांगडा कमी मिळत असल्याने जाण्या-येण्याचा खर्चही त्यांना परवडेनासा झाला आहे. काळबादेवी ते जयगड परिसरात फिशिंगच्या नौकांना चिंगळं मिळत आहेत. त्यावर या मच्छीमारांचा उदरनिर्वाह सुरु आहे. जयगड बंदरातील अनेक नौका बंदरातच उभ्या आहेत. वारे थांबण्याची प्रतिक्षा मच्छीमारांना असून नौका बंद ठेवल्यामुळे लाखो रुपयांचा फटका सहन करावा लागत आहे.