नांदिवडे खून प्रकरणी तपासात प्रियकराचा असहकार

तपासात प्रगती नाही; संशयितांच्या कोठडीत वाढ

रत्नागिरी:- तालुक्यातील नांदिवडे येथे प्रेमसंबंधातून कट रचून वृद्ध पतीचा बाबूने मारुन खून केला. या प्रकरणी जयगड पोलिसांनी दोघा संशयितांना अटक केली. न्यायालयाने त्याना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली होती. मात्र संशयित प्रियकर तपास कामात सहकार्य करत नसल्याने आज त्याला पुन्हा न्यायालयात हजर केले. न्यायालयाने आणखी एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे.

संशयितांकडून याआधीही मृताला मारण्याचा प्रयत्न केल्याचे तपासात पुढे आले आहे. शितल सुरेश पडवळ (वय ५१, रा. भंडारवाडा-नांदिवडे, रत्नागिरी) व मनराज दत्ताराम चव्हाण (वय ५१, रा. नांदिवडे, रत्नागिरी) अशी संशयितांची नावे आहेत. ही घटना गुरुवारी (ता. २५) सायंकाळी पाच ते शुक्रवारी (ता. २६) सकाळी अकराच्या सुमारास नांदिवडे येथे घडली. संशयितांनी सुरेश धोंडू पडवळ (वय ६४, रा. नांदिवडे-भंडारवाडा, रत्नागिरी) यांचा बांबूने मारहाण करुन खून केल्याचा संशय आहे. या प्रकरणी पोलिस पाटील तन्वी अतुल आडाव (वय ३४, रा. भंडारवाडा-नांदिवडे, रत्नागिरी) यांनी जयगड पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानुसार शितल पडवळ हीने प्रियकर मनराज चव्हाण यांनी कट रचला. त्यानी सुरेश पडवळ यांना लाकडी बांबुने व कोणत्यातरी हत्याराने हाताला तसेच छातीवर डाव्या बाजूला डोक्याला मारहाण करुन ठार मारले. या घटनेचा तपास जयगड पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक कुलदीप पाटील करत आहेत. पोलिसांनी तपासात घटनास्थळावरील बांबु, संशयितांनी रक्त पुसुन टाकण्यासाठी वापरलेली गोधडी, संशयितांच्या अंगावरील कपडे हस्तगत केले आहेत. मात्र या घटनेला पाच दिवस उलटून गेले तरी संशयित मनराज चव्हाण यांच्याकडून पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे मिळत होती.

ठार मारण्याचा हेतू?

संशयित शीतल हिचा पतीला ठार मारण्याचा हेतू नव्हता, असेच न्यायालयापुढे सांगण्यात येत आहे. त्यामुळे या खून प्रकरणातील गुढ वाढत आहे. पोलिस कोठडीची मुदत संपल्याने आज पुन्हा संशयितांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने एक दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.