संंगमेश्वर:- संंगमेश्वर तालुक्यातील बोंड्ये सुतारवाडीतील विजय दगडू पांचाळ यांच्या घराला आज (दि.१९) सकाळी १० वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. यावेळी घरात कोणीही नव्हते.या आगीत संपूर्ण घर जळून खाक झाले असून अंदाजे ९ लाख ३० हजारांचे नुकसान झाले आहे. आगीचे कारण स्पष्ट झालेले नाही.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, बोंड्ये सुतारवाडी येथील विजय पांचाळ हे पत्नी, मुलगा, सून व दोन नातवंडे यांच्यासह राहतात. त्यांच्या मुलगीच्या मुलाला बरे वाटत नसल्यामुळे त्याला बघण्यासाठी ते आज सकाळी पत्नीसह मुंबईला जाण्यासाठी निघाले होते. तर मुलगा देवरूखला कामाला गेला होता. तसेच सून मार्लेश्वर येथे कामाला गेली होती. तर दोन नाती शाळेत गेल्या होत्या. त्यामुळे घर बंद करून ते मुंबईला जाण्यासाठी देवरूखला पोहचले असताना अचानक त्यांच्या बंद घराला आग लागल्याचे त्यांना समजले. घराला आग लागल्याचे समजताच त्यांनी तात्काळ बोंड्येत धाव घेतली.
दरम्यान, घराला आग लागल्याचे शेजारच्या लोकांना दिसताच त्यांनी धाव घेत घर गाठले. परंतु घर बंद असल्याने त्यांना काहीच करता येत नव्हते. शेवटी घरातील मंडळी आल्यानंतर कुलुप तोडून आत प्रवेश करण्यात आला. तोपर्यंत आगीने रौद्ररूप धारण केले होते. घराला आग लागल्यानंतर गावातील सामाजिक कार्यकर्ते बंडू चव्हाण यांनी देवरूख नगरपंचायतला याबाबतची माहिती देवून अग्निशमन बंब पाठवण्याची विनंती केली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाला. मात्र तोपर्यंत आगीने घराला चारही बाजूने वेढा घातला होता. बंबाच्या सहाय्याने आग विझवण्यात आली परंतु आगीत घर जळून भस्मसात झाले. बंब येईपर्यंत वाडीतील अनंत पांचाळ, विनोद पांचाळ, पांडुरंग पांचाळ, हरीश्चंद्र गुरव, तुकाराम मांडवकर, मनोहर पांचाळ यासह इतर ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत आग विझवण्यासाठी प्रयत्न केले.
दरम्यान, आगीची घटना समजताच मंडळ अधिकारी मुबारक तडवी, तलाठी दिपीका तांबे, तलाठी संतोष वाघधरे यांनी घटनास्थळी जावून पंचनामा केला. यावेळी सरपंच नम्रता पांचाळ, माजी सरपंच ललिता गुडेकर, पोलीस पाटील महेंद्र करंबेळे, गावातील सामाजिक कार्यकर्ते बंडू चव्हाण आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. आगीत कपडे, धान्य, किंमती वस्तू, रोख रक्कम, घराचे लाकडी साहित्य जळून खाक झाले आहे. हे सर्व मिळून ९ लाख ३० हजार रूपयांचे नुकसान झाले आहे. मोलमजूरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या विजय पांचाळ यांचे घर आगीत भस्मसात झाल्याने त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. तर आता रहायचे कुठे? असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला आहे.