रत्नागिरी:- जिल्हा शासकीय रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे रिक्त असल्याची वस्तुस्थिती आहे. परंतु ही परिस्थिती आजची नाही, अनेक वर्षांपासूनची आहे. महिनाभरापूर्वीच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडे जिल्हा रुग्णालय आले आहे. वर्ग एकचे ४ वैद्यकीय अधिकारी आले आहेत. १५ दिवसात भुलतज्ज्ञ मिळतील. त्यादृष्टीने आरोग्य संचालकांशी पत्रव्यवहार सुरू आहे. हा संक्रमनाचा काळ असून येत्या ६ महिन्यात पुर्ण चित्र बदलेले असले. सर्वसामान्यांना चांगली आरोग्य सुविधा मिळेल, असा ठाम विश्वास शासकीय वैद्यकीय महाविद्यलयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी व्यक्त केला.
जिल्हा शासकीय रुग्णालयात काल रात्री चार तास वैद्यकीय अधिकारीच नसल्याची तक्रार काही नातेवाईकांनी आमदार राजन साळवी यांच्याकडे केली होती. यावरून काल रुग्णालयात गोंधळ झाला. याबाबत नेमकी वस्तूस्थिती जाणून घेण्यासाठी डीन डॉ. रामानंद यांच्याशी चर्चा केली असता ते म्हणाले,
जिल्हा रुग्णालयातील अपघात विभागात ड्युटीला असलेले डॉक्टर आजारी असल्याने अचानक रजेवर गेले. त्यांच्याजागी डॉ. कुमरे यांनी दुसऱ्या डॉक्टरची नियुक्ती करणे गरजेचे होते, परंतु ती केली नाही. त्यामुळे डॉक्टर नव्हते ही वस्तुस्थिती आहे. जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांची कमतरता आहे. परंतु वैद्यकीय महाविद्यालयामुळे टप्प्या, टप्प्याने ही कमतरता पुर्ण होईल. सहा महिन्यात चित्र बदललेले असेल. त्यासाठी मंत्रालय स्तरावर आणि पालकमंत्री उदय सामंत यांच्यामार्फत पाठपुरावा आम्ही पाठपुरवा करत आहे. तसचे आयुक्तींशी चर्चा सुरू आहे. हा संक्रमन काळ आहे, व्यवस्था बदलत आहे. राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयातील २ भुलतज्ज्ञ आम्हाला मिळावे, यासाठीचाही प्रस्ताव दिली आहे. त्याचाही रोज पाठपुरावा सुरू असून येत्या १५ दिवासत त्यावर तोडगा निघेल.
जिल्हा रुग्णालयातील काही डॉक्टर अचानक सोडुन गेल्याचे समजते, यावर ते म्हणाले, रुग्णालयातील एक गायनॅकल डॉक्टर रजेवर गेले आहेत, अन्य एक डॉक्टरही रजेवर आहे. परंतु वर्ग एकचे ४ वैद्यकीय अधिकारी आपल्याला मिळाले आहेत. त्यामुळे नजिकच्या काळात हे आपले रुग्णालय आहे, असे रुग्णांना नक्की वाटेल. जिल्हा रुग्णालयाची अस्थापना आमच्याकडे आल्यानंतर आम्ही अनेक बदल केले. श्रमदान करून स्वच्छता मोहिम राबवली. सर्व संवर्गाशी चर्चा सुरू आहे. औषध भांडार आमच्या ताब्यात येणार असून त्याबाबत धोरण ठरविले जात आहे. अपघात विभाग पुढे आणला जाणार असून लवकच एमआरआय मिळणार आहे. हळुहळु सुविधा वाढत असून दोन पॅथॉलॉजिस्ट हजर झाले आहे. लागलेल्या सर्व चाचण्या मोफत मिळतील. २१ विभागांमध्ये येणाऱ्या काळात सकारात्मक बदल होती. जनतेचा शासकीय यंत्रणेवरील विश्वास वाढले, असे मत डॉ. रामानंद यांनी व्यक्त केले.